चार हजार रुपयांची लाच घेताना ऑर्डर्ली पकडला गेल्याने अखेर मुलुंडचे वरिष्ठ निरीक्षक फुलसिंग पवार यांना बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. लाच प्रकरणी कनिष्ठ पकडला गेला, तर वरिष्ठांवर कारवाई करण्याचे परिपत्रक पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी जारी केले होते. खार लाच प्रकरणानंतर आता मुलुंडच्या वरिष्ठ निरीक्षकांची गच्छंती झाली आहे.
मुलुंडचे वरिष्ठ निरीक्षक पवार यांचे कार्यालयीन मदतनीस (ऑर्डर्ली) उमेश जोशी याला एका मुक्त पत्रकारासह लाच घेताना अटक झाली होती. जोशी याची टिळकनगर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यामुळे तो रजेवर गेला होता. परंतु रजेवर असतानाही लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तो पोलीस ठाण्यात आला त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर शनिवारी वरिष्ठ निरीक्षक पवार यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.
मुलुंड पोलीस ठाण्यातील दोघा शिपायांनाही यापूर्वी एका टपरीवाल्याकडून लाच घेताना अटक झाली होती. एक व्यापारी कल्पेश दंड यांच्या आत्महत्याप्रकरणात चिठ्ठी आढळलेली असतानाही ती लपवून सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. दंड यांच्या पत्नी आयुक्त मारीया यांच्याकडे गेल्यानंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी खंडणीखोरी झाल्याचे मारीया यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले होते. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे घाटकोपर युनिट तपास करीत होते. आता लाच प्रकरणातच वरिष्ठ निरीक्षकांचा ऑर्डर्लीच पकडला गेला.