मुंबई व ठाणे शहर अध्यक्षपदाचा वाद मिटविण्याकरिता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च लक्ष घातले असून, स्थानिक नेत्यांबरोबर संवाद साधून मार्ग काढण्यावर भर दिला आहे.
छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे पवार यांनी ऐकून घेतले. मुंबईत अनेक प्रयत्न करूनही पक्ष वाढत नसल्याने कोणाकडे नेतृत्व सोपवायचे याबाबत पक्षात दुमत आहे. सचिन अहिर, प्रसाद लाड, नवाब मलिक यापैकी कोणाला अध्यक्ष नेमायचे वा अन्य कोणाला संधी द्यायची याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत पक्षवाढीसाठी संधी असताना आपापसातील वादामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला.  ठाणे शहर अध्यक्षपदासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नजिब मुल्ला यांच्या नावाचा आग्रह धरला असला तरी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी या नावाला विरोध दर्शविला आहे.