शरद पवार यांच्या गौरवाचा ठराव आधी; इंदिरा गांधी यांना प्राधान्य नाही

केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना शरद पवार यांनी डोळे वटारल्यावर काँग्रेसचे नेतृत्व नरमाईचे धोरण स्वीकारायचे. आता आघाडी तुटली तरी राष्ट्रवादीची दादागिरी काँग्रेसला सहन करावी लागत असल्याचे सोमवारी पुन्हा अनुभवास आले. इंदिरा गांधी की शरद पवार यापैकी कोणत्या नेत्याच्या गौरवाचा ठराव आधी मांडायचा यावरून झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने ताणून धरल्याने काँग्रेसने सपशेल माघार घेतली आणि पवारांच्या गौरवाचा ठराव आधी मांडण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

विधिमंडळात इंदिरा गांधी, शरद पवार यांच्यासह पाच नेत्यांचा संसदीय कार्याबद्दल गौरव करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने शरद पवार यांचा ठराव आधी घ्यावा, असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. इंदिरा गांधी या माजी पंतप्रधान असल्याने राजशिष्टाचारानुसार त्यांचा ठराव आधी घेतला जावा, असे पत्र काँग्रेसने दिले होते. या मुद्दय़ावरून दोन्ही काँग्रेसचे फाटले आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्या बैठकीला जाण्याचे राष्ट्रवादीने टाळले होते.

अधिवेशनात विरोधक दुभंगले गेले आहेत हे चित्र योग्य ठरणार नाही हे लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सकाळी चर्चा केली. त्यात उभय नेत्यांची बैठक घेण्याचा निर्णय झाला. विखे-पाटील यांच्या कार्यालयात जाण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नकार दिला. मग विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण व नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री, शरद रणपिसे, संजय दत्त, नसिम खान आदी काँग्रेस नेते राष्ट्रवादीच्या विधान भवनातील कार्यालयात दाखल झाले. अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना या वादाबद्दल चांगलेच सुनावले. इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दीनिमित्त काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात कोणते कार्यक्रम घेतले वगैरे प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेनंतर शरद पवार यांच्या गौरवाचा ठराव आधी मांडण्यास काँग्रेस नेत्यांनी होकार दिला. मग मुख्यमंत्री व दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या गौरवाचा ठराव ५ ऑगस्टला, छोडो भारत दिनी म्हणजेच ९ तारखेला इंदिरा गांधी, तर १० तारखेला दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख आणि बाळासाहेब देसाई यांच्याबाबतचा ठराव मांडला जाईल. शरद पवार आणि गणपतराव देशमुख हे विधिमंडळाशी संबंधित असल्याने त्यांच्या गौरवाचा ठराव आधी मांडण्यात येणार आहे.

तेव्हा आणि आता : यूपीएचे सरकार असताना राष्ट्रवादीची दादागिरी चालायची. आघाडी तुटल्यावरही राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. गेल्या वर्षी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला दोन जागा सोडल्या होत्या. आताही इंदिरा गांधी यांच्याऐवजी शरद पवारांचा ठराव आधी मांडण्यास संमती दिली. राष्ट्रवादीची नाराजी ओढवू नये म्हणून काँग्रेसने हे पाऊल उचलले असले तरी त्यातून काँग्रेसची अगतिकता दिसून आली.