बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणी मुंबई पोलीसांनी शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय यांना अटक केली आहे. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
शीना बोरा प्रकरणाच्या तपासात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्वतः लक्ष घातले होते. आरोपींच्या चौकशीसाठी ते स्वतः दोन वेळा खार पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच गृह विभागाने त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. त्यांची राज्याच्या गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून बढतीवर नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविण्यात आले होते. शीना बोरा हत्याकांड तपासामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, गृह विभागाने ती फेटाळली. यानंतर गृह विभागाने बदलीनंतरही त्यांच्याकडेच या तपासाची सूत्रे राहतील, असे स्पष्ट केले होते. पण, राकेश मारिया यांनी तपासाची सूत्रे पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आता हा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.