सुरेश गंभीर आणि गणाचार्य यांचा रामराम

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला खिंडार पाडण्यास सुरुवात केली असून, माहीम मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सुरेश गंभीर आणि  बेस्ट समितीवर सदस्यपद भूषविणारे सुनील गणाचार्य यांनी शुक्रवारी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या पुढाकाराने सुरेश गंभीर आणि सुनील गणाचार्य यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शुक्रवारी आशीष शेलार यांच्या उपस्थितीत दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. बाळासाहेबांच्या मर्जीतील असलेल्यांपैकी एक सुरेश गंभीर १९७८ मध्ये माहीम परिसरातून पालिका निवडणुकीत विजयी होऊन नगरसेवक झाले होते. त्यानंतर माहीम विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले होते. कामगार नेते गुलाबराव गणाचार्य यांच्या तालमीत वाढलेले त्यांचे पुत्र सुनील गणाचार्य समाजवादी पार्टीच्या उमेदवारीवर १९९७ मध्ये पालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले होते.  दहा वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून गेल्या काही वर्षांपासूून ते बेस्ट समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणाचार्य यांनी बेस्ट उपक्रमातील अनेक प्रश्नांना समितीच्या बैठकीत वाचा फोडली होती. त्याचबरोबर बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस आमि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. समाजवादी पार्टी, शिवसेना असा प्रवास करून गणाचार्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आमचा शिवसेनेबद्दल कोणताही आक्षेप नाही. फक्त मोदी आणि फडणवीस यांच्या कार्यामुळे भारावून भाजपात प्रवेश केल्याचे गंभीर आणि गणाचार्य यांनी सांगितले. गंभीर यांच्या मुलीला भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.