भाजपचा मतदारसंघ असलेल्या नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी शिवसेनेच्या पाच उमेदवारांच्या मुलाखती शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्या. त्यामुळे हा मतदारसंघ पदरात पाडून घेण्याचा शिवसेना कसोशीने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघाचा शेजारी मतदारसंघ असलेल्या ऐरोली मतदारसंघासाठीही सात इच्छुकांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती.
ठाणे जिल्हय़ातील १८ मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांच्या मातोश्रीवर बुधवारी मुलाखती घेण्यात आल्या. नवी मुंबईतील सत्ताधारी नाईक कुटुंबातील दोन आमदारांना टक्कर देण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे भाजपच्या कोटय़ात असलेल्या बेलापूर मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्यासाठी बुधवारी उपनेते विजय नाहटा, नगरसेवक विठ्ठल मोरे, कामगार नेते मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, सुकुमार किल्लेदार यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ऐरोली मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, युवा नेते वैभव नाईक, नगरसेवक मनोज हळदणकर, उपशहरप्रमुख सुरेश म्हात्रे, द्वारकानाथ भोईर, परशुराम ठाकूर व महिला आघाडीप्रमुख रंजना शिंत्रे यांच्या मुलाखती झाल्या. या वेळी ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, आमदार अनिल देसाई उपस्थित होते. गायखे यांनी ‘एकनिष्ठ’ उमेदवारांचा मुद्दा उपस्थित केल्याने या बैठकीत काही क्षण वातावरण तंग झाल्याचे समजते.