एकीकडे काँग्रेसचे सदस्य राष्ट्रवादीला चिमटे काढतात तर दुसरीकडे शिवसेनेचे सदस्य संधी मिळेल तेव्हा भाजपला घरचा आहेर देतात, हे गेल्या काही दिवसांतील विधानसभेतील चित्र आहे. गुरुवारी शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील धरणाच्या कामातील भ्रष्टाचारावरून ‘आघाडी सरकारने जे केले तेच तुम्हीही करता’ असा घरचा आहेर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिला.
सातारा जिल्ह्य़ातील निवकणे धरण प्रकल्पाच्या कामात शासनाची परवानगी नसतानाही धरणाची उंची वाढविण्यात आली. एवढेच नव्हे तर ठेकेदाराला त्याच्या वाढीव कामाचे पैसेही देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देसाई यांनी केली. राज्यभरात धरणांच्या कामात भ्रष्टाचार होत असून जोपर्यंत एखाद्या अधिकऱ्याला निलंबित केले जाणार नाही तोपर्यंत सरकारचा धाक निर्माण होणार नाही, अशी तीव्र भावना यावेळी अनेक सदस्यांनी व्यक्त केली. धरणांच्या कामांच्या किमती कोटय़वधी रुपयांनी वाढत आहेत. अनेक प्रकल्प मान्यतेसाठी रखडले आहेत. धरणाच्या वाढीव कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता नाही म्हणून काम केले जात नाही, मात्र साताऱ्यात शासनाची मान्यता नसतानाही धरणाची उंची दहा मीटरने वाढवली जाते आणि या कामाचे कोटय़वधी रुपयेही ठेकेदाराला दिले जातात, असा मुद्दा शंभुराज यांनी उपस्थित केला. या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगताच, सरकार येऊन चार महिने झाले. तुमच्याकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, मात्र मागील आघाडी सरकारने जे केले तेच तुम्ही करत आहात, अशी टीका संतापलेल्या शंभुराज यांनी केली.