उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेवरून शिवसेना आक्रमक; युतीबाबत रावसाहेब दानवेंचा नरमाईचा सूर

‘मनोगत’ या भाजपच्या मुखपत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘शोले’ चित्रपटातील असराणीची उपमा देण्यात आल्याने शिवसेनेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. आमच्या पाठिंब्यावर सरकार टिकून आहे याची आठवण करून देतानाच भाजपच्या विरोधात असलेली खदखद उफळली तर भारी पडेल, असा इशारा शिवसेनने भाजपला दिला. शिवसेनेने सरळसरळ दमात घेतल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उभयतांनी सांमजस्यपणाने घ्यावे, असे आवाहन करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडविण्यात आल्याने शिवसेनेला फारच झोंबले. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी ‘शोले’ मधील गब्बरची उपमा दिली. नाशिकमध्ये हा लेख लिहिणारे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजपच्या मुखपत्रातील टीका शिवसेनेने गंभीरपणे घेतली असून, ठाकरे यांच्याबाबत करण्यात आलेली वक्तव्ये ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. आमच्या पाठिंब्यावर हे सरकार सुरू आहे याचे भान ठेवा, अन्यथा छगन भुजबळ, अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्या पाठिंब्यावर सरकार चालविण्याची तुम्हाला मूभा आहे, असो टोलाही लगाविला.

शिवसेनेने कमालीची टोकाची भूमिका घेतल्याने भाजपने सायंकाळी सावरासावरीवर भर दिला. शिवसेनेशी २५ वर्षांची नैसर्गिक मैत्री असून हे सरकार चालावे ही राज्यातील जनतेची इच्छा असून, तसा कौलही दिला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी परस्परांवर टीका, टिप्पणी टाळावी. भाजपच्या कार्यकर्त्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, शिवसेनेही तशा सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा खासदार दानवे यांनी व्यक्त केली. भाजपला भारी पडेल, असा दमच शिवसेनेचे संजय राऊत यांनी दिल्यावर भाजपने फार काही न वाढविता नांगीच टाकली. ठाकरे यांच्या विरुद्ध जहाल लिखाण केलेले प्रवक्ते भंडारी यांना पक्षाने समज दिल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

‘युती टिकावी ही जनतेची इच्छा’

भाजप-शिवसेनेसंदर्भात गेल्या ४-५ दिवसांपासून विपर्यस्त बातम्या येत आहेत. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांबद्दल बोलताना आदरयुक्त भाव ठेवला पाहिजे असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात स्पष्ट केले.  आपल्यामुळे एकमेकांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. तसा सल्ला भाजपने आपल्या पक्षातील मंडळींना दिला आहे. ‘सामना’मधील बातमी ही शिवसेनेचे मत असेलच असे नाही. त्याचप्रमाणे ‘मनोगत’मधील मजकूर भाजपचे अधिकृत मत असेल असे म्हणता येणार नाही. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी  भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे