जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचा विरोध मांडण्यासाठी शिवसेना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दरवाजे ठोठावणार आहे. शिवसेनेच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ पुढील आठवडय़ात पंतप्रधानांची भेट घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. मात्र विरोधाला न जुमानता पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जैतापूर अणुउर्जा प्रकल्प पुढे रेटत असल्याने शिवसेनाही आक्रमकपणे विरोध नोंदविणार आहे. तर जैतापूर प्रकल्प होणारच, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने भाजप-शिवसेनेत या मुद्दय़ावरून तीव्र मतभेद होण्याची चिन्हे आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या फ्रान्स दौऱ्यात जैतापूर प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आले. ‘अरेवा’ ही फ्रेंच कंपनी हा प्रकल्प उभारणार आहे. शिवसेना आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे या प्रकल्पाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित झाली होती. आता शिवसेनेचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. पण जैतापूर प्रकल्प पूर्ण करण्याचे मोदी यांनी ठरविल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळास ते भेट तरी देतील का आणि दिल्यास निवेदनास केराची टोपलीच दाखविली जाईल, असे शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, जैतापूर प्रकल्प ज्या टप्प्यात पोचला आहे, तेथून माघारी वळणे अशक्य असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पर्यावरण खाते शिवसेनेकडे असून, मंत्री रामदास कदम यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीविषयीच्या फाईल्सवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीखेरीज स्वाक्षरी करणार नाही, असे आधीच स्पष्ट केले आहे.

फडणवीस-ठाकरे चर्चा होण्याची शक्यता
जैतापूर प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र त्यास अधिकृतपणे दुजोरा मिळू शकला नाही.