बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी दूरध्वनीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. या सोहळ्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई किंवा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यापैकी एक जण शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून पाटण्याला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये जदयू, राजद आणि काँग्रेस महाआघाडीला घवघवीत यश मिळाले. लालूप्रसाद यादव यांचा राजद सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. येत्या शुक्रवारी नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी देशातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनाही नितीशकुमारांनी शपथविधी सोहळ्याचे दूरध्वनीवरून निमंत्रण दिले. नितीशकुमारांचे निमंत्रण आपण स्वीकारले असून, शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून सुभाष देसाई किंवा रामदास कदम यांच्यापैकी एक नेता पाटण्याला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बिहार निवडणुकीत पुन्हा यश मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून नितीशकुमारांचे अभिनंदन केले होते. त्याचवेळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले होते.