जिने बंद पडल्यास यंत्रणेला त्वरित सूचना

रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना रोखण्यासाठी तसेच वयोवृद्ध व महिला प्रवाशांचे जिने चढण्याचे कष्ट कमी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेले सरकते जिने वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येतात. यावर उपाय म्हणून आता पश्चिम रेल्वेने या सरकत्या जिन्यांमध्ये स्मार्ट चिप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हा प्रश्न सोडवण्यासाठी बसवलेल्या या चिपमार्फत जिने बंद पडल्यावर तातडीने संबंधित यंत्रणेला एसएमएस पाठवला जाणार आहे. परिणामी बिघाडाबाबत तातडीने माहिती मिळाल्यावर तो दुरुस्त करण्याची प्रक्रियाही लवकर पार पडणार आहे. सध्या वसई रोड स्थानकावरील सरकत्या जिन्यात प्रायोगिक तत्त्वावर ही चिप बसवण्यात आली आहे.

उपनगरीय रेल्वेमार्गावर २०१४पासून सरकते जिने बसवण्याची सुरुवात मध्य व पश्चिम रेल्वेने केली होती. एका जिन्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च आला असून असे २३ सरकते जिने पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर लावण्यात आले आहेत. तसेच अजून २७ जिने लवकरच बसवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली. या जिन्यांमुळे स्थानकातील रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना खूपच कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, हे जिने वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. अशा तक्रारी आल्यानंतरच जिन्याची दुरुस्ती होत असल्याने जिना खूप वेळ बंद राहत असल्याचेही आढळले होते. यावर तोडगा म्हणून आता ही स्मार्ट चिप जिन्यांमध्ये बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार वसई रोड स्थानकातील एका सरकत्या जिन्यात अशी चिप बसवण्यात आली आहे. जिना बंद पडल्यानंतर या चिपद्वारे एक संदेश यांत्रिक विभागाला पाठवला जाणार आहे. हा संदेश तातडीने मिळणार असल्याने यांत्रिक विभागाकडून या बिघाडाची दखल त्वरित घेतली जाईल.

चिप बसवण्यासाठी १० ते १५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. असा प्रयत्न याआधीही झाला होता, पण त्या वेळी तो अयशस्वी ठरल्याने आता त्यात काही बदल करून ही नवीन चिप बसवण्यात आली आहे. आता पुढील दोन आठवडय़ांमध्ये आणखी काही स्थानकांमधील सरकत्या जिन्यांमध्ये अशी चिप बसवली जाईल.  – रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे