मानखुर्दमधील घटना

नशेच्या आहारी गेलेल्या मुलाकडून कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने हतबल झालेल्या मातेने मुलाचीच गळा आवळून हत्या केल्याची घटना बुधवारी मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी महिलेला अटक केली आहे.

नदीम इद्रिसी (वय २४) असे या मयत मुलाचे नाव असून तो मानखुर्दमधील साठेनगर परिसरात पत्नी, आई आणि तीन भावंडांसह राहत होता. नदीमला गेल्या वर्षभरापासून अमली पदार्थाचे व्यसन लागले होते. या व्यसनासाठी तो कुटुंबातील सदस्यांकडून वारंवार पैशाची मागणी करीत असे. तसेच पैसे न मिळाल्यास भावंडांना मारहाण करीत असे.

अनेकदा त्याने नशेमध्ये कुटुंबातल्या सदस्यांवर प्राणघातक हल्लेही केले होते. नदीमच्या वर्तणुकीमुळे कुटुंबीय त्रस्त होते. मंगळवारी रात्री कुटुंबातील अन्य सदस्य घराबाहेर झोपले असताना घरी आलेल्या नदीमने पैशांची मागणी करीत

आईला, अन्वरीबानो इद्रिसी हिला (वय ४८) मारहाण केली. त्यामुळे अन्वरीबानो हिने त्याचे हातपाय ओढणीच्या साह्याने बांधून गळा दाबून नदीमची हत्या केली.

बुधवारी सकाळी ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी नदीमचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मृतदेह ताब्यात घेत तो राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदानासाठी पाठवला. प्राथमिक अहवालामध्ये नदीमचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे येथील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. मानखुर्द पोलिसांनी नदीमच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याची आई अन्वरीबानो हिने गुन्ह्यची कबुली दिली.