राज्य परिवहन महामंडळात सध्या चालकांची कमतरता असून एसटी महामंडळाने कनिष्ठ चालकांच्या ७७६९ पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विनावाहक गाडय़ांची संख्या वाढत असल्याने आता एसटी महामंडळात चालकांना वाहकांच्या कामाचेही धडे गिरवावे लागणार आहेत. कनिष्ठ वाहकपदाच्या अर्जातच ही माहिती देण्यात आली आहे.
एसटीत ३५ हजार चालक असूनही महामंडळाकडे चालकांची कमतरता आहे. त्यामुळे कनिष्ठ वाहक भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजे २४ मार्चपर्यंत तब्बल ३३ हजार ५००हून अधिक अर्ज सादर झाल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कनिष्ठ चालक पदासाठी दाखल झालेल्या अर्जामध्ये मुंबई, ठाणे यांसह पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, यवतमाळ आणि धुळे येथील उमेदवारांची संख्या जास्त आहे. अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आता लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार असून पुढील महिन्यात होणाऱ्या या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर जून महिन्यात तिचा निकाल लागणार असून जुलै महिन्यात कागदपत्रांची तपासणी होणार आहे. तसेच पुण्यातील भोसरी येथे
त्यांची प्रत्यक्ष चाचणी होणार
आहे. त्यामुळे या चालकांना सेवेत येण्यास तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागेल.