राज ठाकरे

यांची घोषणा
नाशिक येथील गोदापार्क परिसरात शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय उभारण्यात येणार असून त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले. बाळासाहेबांसारख्या लढवय्या व्यक्तिमत्त्वासाठी हे यथोचित स्मारक असेल, असेही राज म्हणाले.
वांद्रे येथील रंगशारदामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रातील दुष्काळात सध्या फिरणाऱ्या आणि आंदोलनाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज यांनी जोरदार टीका केली. गेली पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना यांनी काही केले नाही. सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी व जनता दुष्काळाने होरपळत असल्याचे राज म्हणाले. गेल्या वर्षी दुष्काळात मनसेने राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्या काढल्यामुळे काही हजार जनावरे वाचली होती; तथापि आताचे भाजपचे सरकार काहीही करत नसल्याचा फटका दुष्काळग्रस्तांना बसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे रिकाम्या हाताने परदेशात जातात आणि रिकाम्या हाताने परत येतात. आता हे जपानला गेले आहेत तेथून बारीक (मिचमिचे) डोळे घेऊन येतात का तेच बघायचे आहे. शिवसेनाप्रमुखांचे यथायोग्य स्मारक कसे असेल ते नाशिकमध्ये लोकांना दिसेल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मदतीने शस्त्रास्त्रांचे भव्य संग्रहालय उभारण्यात येणार अहे.

ंआयआरबी सर्वच पक्षांना पैसा पुरवते’
आयआरबी कंपनी ही सर्वच राजकीय पक्षांना पोसत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील गाडय़ांच्या संख्येची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाल्यानंतर आयआरबीकडून होणारी फसवणूक उघडकीस आली असून, याबाबत बोलताना आयआरबी सर्वानाच मूर्ख बनवत असल्याची टीकाही राज यांनी केली. माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार दर तासाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरून केवळ चार वाहाने जात असल्याचे दाखविण्यात आले आहे. याचा अर्थ वर्षांकाठी तीन-साडेतीन हजार वाहनेच केवळ जात असून, ही सर्व माहिती खोटी असल्याचे राज यांनी सांगितले.