सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. हैदर अली जाफरी (१५) असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो गोवंडीतील शिवाजी नगर येथील जाफरी इंग्रजी शाळेत दहावीत शिकत होता.
जाफरी इंग्रजी शाळेची मालाड येथील मढमधील सानिया रिसॉर्टला सहल गेली होती. रिसॉर्टमध्ये तरणतलावात मुले खेळत असताना कोपऱ्यात हैदर जमिनीवर निपचित पडल्याचे निदर्शनास आले. त्याला आकडीचा त्रास झाला असे वाटल्याने प्राथमिक उपचार देण्यात आले होते. तेव्हाही तो शुद्धीत न आल्याने त्याला पुढील उपचारासाठी मालाडच्या अ‍ॅटलांटा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रविवारी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात हैदरचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले. रिसॉर्टमधील आंब्याच्या झाडावरील कैऱ्या तोडण्यासाठी हैदर चढला होता. त्या वेळी विजेच्या उघडय़ा तारेशी संपर्क आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. यामुळे मालवणी पोलिसांनी रिसॉर्टच्या व्यवस्थापनावविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.