,१३,१८३ विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत

मुंबई विद्यापीठाचे आत्तापर्यंत केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांचेच निकाल जाहीर झाले आहेत. तर तब्बल ४,१३,१८३ विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. एकूण निकालाच्या आकडय़ांमध्ये विद्यापीठाने ४७७ निकालांपैकी २८९ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत, परंतु या २८९ परीक्षांना फक्त ६४,३१४ विद्यार्थी बसले होते. त्यामुळे केवळ आकडय़ाचा फुगवटा करून जाहीर निकालाची संख्या वाढविणाऱ्या विद्यापीठाने विधि, वाणिज्य, कला, विज्ञान, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या शाखांमधील महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल मात्र रखडवलेच आहेत हे या आकडेवारीतून सिद्ध होत आहे.

विद्यापीठाला वाढीव मुदत देऊनही विद्यापीठाने विधि शाखेच्या एकाही परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांचे सर्व निकाल जाहीर करण्याचे आश्वासन ३० जुलैपासून विद्यापीठ देत आहे. प्रत्यक्षात मात्र विज्ञान शाखेतील एकूण ६९,१२१ विद्यार्थ्यांपैकी निम्म्याच म्हणजे ३७,५८७ इतक्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहे. तंत्रज्ञान शाखेचे तर १७७ निकालांपैकी फक्त ६३ निकाल जाहीर झाले असून ६३,९५१ विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. तर व्यवस्थापन शाखेचे १३ निकाल जाहीर झाले आहेत आणि २५,९७० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. सर्वात जास्त परीक्षा या कला शाखेच्या आहेत. कला शाखेच्या १५० निकालांपैकी ३२ निकाल रखडलेले असून ५८,१५५ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. सर्वात जास्त विद्यार्थी हे वाणिज्य शाखेच्या परीक्षांना बसलेले आहेत. वाणिज्य शाखेचे आत्तापर्यंत केवळ ११६ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर १,८६,२१७ इतके विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विधि शाखेच्या सर्वच  विद्यार्थ्यांना निकालाची वाट पाहावी लागत आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात १९,३४७ उत्तरपत्रिकाचे मूल्यांकन झाले असून १०८२ प्राध्यापक हजर होते.