राज्य बालहक्क आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्येप्रकरणी रविवारी नवी मुंबई पोलिसांनी खारघर येथे व्याजाच्या पैशांची पठाणी वसुली करणाऱ्या सुरेंद्र बात्रा याला अटक केली आहे. बात्रा याच्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. पोलिसांनी याआधी ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे म्हटले असले तरी बात्रा याच्या अटकेने ही हत्या नेमकी कशासाठी झाली, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
याबाबत नवी मुंबई कमालीची गोपनीयता बाळगली आहे. सोमवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी या प्रकरणातील अजून दोन आरोपी अटक केली.
शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान खारघर, सेक्टर- १७ येथील वास्तुविहार येथील सिलेब्रेशन इमारतीमध्ये राहणाऱ्या जयस्वाल या घरात एकटय़ा असताना त्यांची हत्या करण्यात आली. जयस्वाल यांचे पती मालेगाव येथील न्यायालयात न्यायाधीश आहेत, तर दोनही मुले डॉक्टर आहेत.
शुक्रवारी सायंकाळी जयस्वाल यांच्या दाराची बेल वाजवून सूरज चैसवार व मनिंदरसिंग वाजवा यांनी आत प्रवेश मिळविला. त्यानंतर या दोनही मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. मारहाणीच्या प्रतिकार करताना जयस्वाल यांच्या हाताची बोटे तुटली, मानेवर व कानावर चाकूचे वार झाले. जयस्वाल यांच्या मृत्यूची खात्री पटल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्या घरातील कपाटे, लॉकरची झडती घेतली.
 मात्र जयस्वाल यांच्या घरात काहीच मौल्यवान व रोख रक्कम न मिळाल्याने मारेकऱ्यांनी जयस्वाल यांच्या हातातील सुमारे ५ ग्रॅम वजनाच्या दोन बांगडय़ा घेऊन तेथून ते दोघेही फरार झाले, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, जयस्वाल यांचे कामोठे येथे राहणारे कौटुंबिक मित्र डॉ. संतोष यांनी जयस्वाल यांच्या घराकडे धाव घेतल्यावर मीनाक्षी या रक्ताच्या थोराळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या आढळल्या.
कोण आहे बात्रा?
बात्रा हा खारघर, सेक्टर- १२ येथे रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान चालवितो. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नावावर त्याचा व्याजाने पैसे देऊन त्या व्याजाची वसुली करण्याचा व्यवसाय असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत असल्याचे समजते. यापूर्वी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक व चोरी करणारा सराईत गुन्हेगार म्हणून त्याचे छायाचित्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक काकडे यांच्या कारकीर्दीत दर्शनी भागात लावण्यात आले होते. त्यानंतर त्याने आपला व्यवसाय बेलापूरमधून खारघर येथे स्थित केला. त्याचे खारघर पोलिसांशी अनेकदा खटके उडाले आहेत. मात्र त्याचे वपर्यंत हात असल्याने पोलीसही त्याला हटकायला मागे पडत असल्याचे पोलीस सांगतात. दोन वर्षांपूर्वी त्याने काकडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यातच धमकावले होते. त्याची नोंदही पोलीस ठाण्यात आहे. व्याजाच्या सावकारीमुळे अनेकांना घरांच्या फाईल ठेवून कर्ज देणारा बात्रा असल्याने त्याच्या चक्रवाढ व्याजाने गरजू व्यक्ती त्याच्या नावाने अनेकदा पोलीस ठाण्याकडे आल्या आहेत.