‘नेतृत्वाचे सर्वाधिकार सायरस यांनाच होते’

टाटा समूहात कंपनी सुशासनाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत आपल्याला ‘कर्जबुडव्या अध्यक्ष’ ठरवून पदावरून काढण्यात आल्याच्या सायरस मिस्त्री यांनी केलेल्या आरोपांना टाटा समूहाने गुरुवारी प्रत्युत्तर दिले. मिस्त्री यांना नेतृत्वाचे सर्वाधिकार दिले होते.  मात्र, त्यांनी संचालक मंडळाचा विश्वास गमावला, असे टाटा समूहाने स्पष्ट केले आहे.

अध्यक्षपदावरून गच्छंती झाल्यानंतर मिस्त्री यांनी मंगळवारी टाटा समूहाच्या संचालक मंडळ तसेच विश्वस्तांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये समूहाच्या एकूणच कारभारावर टीका केली होती. यानंतर हे पत्र बुधवारी समाजमाध्यमांमधून प्रसारित झाले. याबाबत टाटा समूहाने गुरुवारी प्रसिद्धीपत्रक जारी केले. मिस्त्री यांच्या ‘गोपनीय’ पत्राबाबत झालेली घडामोड अयोग्य असल्याचे नमूद करत हा एक ‘पोरकट’पणा असल्याचे टाटा समूहाने म्हटले आहे. मिस्त्री यांच्या ‘कर्जबुडव्या अध्यक्ष’ ठरवून आपल्याला पदावरून काढण्यात आल्याच्या आरोपाचाही समूहाकडून इन्कार करण्यात आला आहे.

टाटा सन्सच्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सायरस मिस्त्री हे समूहाच्या संचालक मंडळात २००६ पासून आहेत. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली आणि २८ डिसेंबर २०१२ मध्ये ते टाटा सन्सचे अध्यक्ष बनले. तेव्हा टाटा समूहाच्या संपूर्ण संस्कृती, कंपनी सुशासन तसेच वित्तीय बाजूंबाबत ते पूर्णपणे अवगत होते. मिस्त्री यांनी संचालक मंडळ सदस्यांना पत्र लिहून त्यांच्या प्रतीही अविश्वास दाखविला असून समूहाच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या नजरेतही स्वत:ची प्रतिमा मलीन करून घेतली आहे, असेही पत्रात म्हटले आहे.