बँक खातेदारांना त्यांच्याकडे असलेले जुने धनादेश आणखी तीन महिने उपयोगात आणण्याची मुभा रिझव्‍‌र्ह बँकेने दिली आहे. धनादेश प्रणालीतील सामायिकता व सुरक्षिततेचा पैलू अधिक मजबूत करण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली ‘सीटीएस-२०१०’ ही नवीन धनादेश प्रणाली १ जानेवारी २०१३ ऐवजी आता १ एप्रिल २०१३ पासून लागू होईल. सहकारी, ग्रामीण बँकांसह सर्वच बँकांना नव्या संक्रमणाशी जुळवून घेण्यासाठी धनादेश रचनेत बदल करण्यास कालावधी मिळावा, याकरीता हा बदल करण्यात आल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे. याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेकडे आलेल्या असंख्य सूचनांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही बँकेने म्हटले आहे. खातेदारांनी जुने धनादेश संबंधित बँकेकडे जमा करून नव्या ‘सीटीएस-२०१०’ प्रणालीतील धनादेश स्वीकारावे, असे आवाहनही बँकेने केले आहे.