तोतया आयकर अधिकारी बनून व्यापाऱ्याला १५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील ८ जणांना चारकोप पोलिसांनी अटक केली. तोतया आयकर अधिकाऱ्यांवर आधारित ‘स्पेशल २६’ हा सिनेमा पाहून त्यांनी हा गुन्हा केला होता.
मेमध्ये चारकोप येथील एका व्यापाऱ्याच्या घरात काही आयकर अधिकाऱ्यांनी छापा घातला. तपासणी करण्याच्या बहाण्याने त्यांनी घरातील १५ लाखांची रोकड, महागडी घडय़ाळे आणि कागदपत्रे घेऊन पोबारा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप रावराणे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून ८ जणांना अटक केली. उत्तर परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी सांगितले की, आरोपींमध्ये एक जण फिर्यादीचा पुतण्या आहे. त्यांनी पूर्वी फिर्यादीच्या घरी चोरी करायचा प्रयत्नही केला होता; पण त्यात यश आले नव्हते.