७० हून अधिक झाडे धारातीर्थी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाडांच्या मुळावर

पहिला पाऊस मुंबईकरांना सुखावणारा असला तरी सिमेंट काँक्रीट व डांबरांच्या रस्त्यांमुळे आखुडलेल्या मुळांसह जीव मुठीत धरून राहणाऱ्या झाडांवर मात्र आपत्ती आणणारा ठरला आहे. पहिल्याच पावसाच्या झपाटय़ात अवघ्या आठवडाभरात मुंबईतील तब्बल ७० हून अधिक झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. झाडांच्या मुळांचा फास सैल करण्याचे आदेश हरित न्यायालयाने दिल्यानंतरही प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने झाडांची स्थिती ही अशी दयनीय झाली आहे.

मुंबईत वर्षभर कमी-अधिक प्रमाणात झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे मुळापासून उखडणे असे प्रकार घडतात. पण पाऊस व सोसाटय़ाचा वारा यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर मोठे संकट येते. दरवर्षी पावसाच्या चार महिन्यांत दीड ते दोन हजार झाडांच्या तक्रारी येतात. त्यातील किमान ३० टक्के झाडे मुळासकट उन्मळून पडलेली असतात. या वर्षी गेल्या आठवडय़ाभरात अग्निशमन दलाकडे ३८० झाडे पडल्याच्या तक्रारी आल्या. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी तब्बल ११०० मिमी पावसामुळे पावसाच्या पहिल्या आठवडय़ात ३७५ झाडांचे नुकसान झाले होते. या वेळी फक्त ६०० मिमी पावसात व तुलनेने कमी वाऱ्यांमध्येही तेवढय़ाच झाडांवर गदा आली आहे. ३८० पैकी १०९ झाडे पूर्व उपनगरातील, १९७ झाडे पश्चिम उपनगरातील तर ७४ झाडे दक्षिण भागातील होती. यापैकी ७२ वृक्ष उन्मळून पडले असून इतर झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. उन्मळून पडलेल्या झाडांमध्ये पालिकेच्या ३३, तर इतर ३९ झाडांचा समावेश आहे. झाडांच्या बुंध्यापर्यंत केलेले काँक्रीटीकरण, मुळांना हवा व पाणी, वाढीसाठी जागा मिळत नसल्याने शहरातील झाडे अशक्त झाली आहेत. त्यामुळे सोसाटय़ाचा वारा किंवा पाऊस यामुळे झाडे उन्मळून पडण्याची शक्यता वाढते. झाडांच्या मुळांना हवा व पाणी मिळण्यासाठी पदपथांची रचना बदलण्याची सूचना पालिकेनेच नेमलेल्या समितीतील तज्ज्ञांनी केली होती. पेव्हर ब्लॉकऐवजी जाळ्यांच्या लाद्या असलेले पदपथ लावणे झाडांसाठी उत्तम आहे, मात्र पालिकेने अजूनही या उपायांची अंमलबजावणी केलेली नाही, असे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. विद्याधर ओगले म्हणाले. याशिवाय झाडांची अशास्त्रीय छाटणी हेदेखील मोठे कारण आहे. रस्त्याच्या बाजूनेच असलेल्या फांद्या तोडल्याने झाडे असमतोल होऊन तुटतात. त्यामुळे पालिकेने गेल्या वर्षीपासून खासगी जागेवरील झाडांचीही शास्त्रीय छाटणी सुरू केली. मात्र ही छाटणीही योग्य नसल्याचे दिसत असून झाडे पडण्याच्या संख्येत घट झालेली नाही.

१० लाख झाडे गेली कुठे?

५ जून या पर्यावरण दिनाचे निमित्त साधून पालिका दर वर्षी एक लाख वृक्षरोपण करण्याचा संकल्प जाहीर करते. मात्र ही झाडे कोणती, कुठे लावली जातात व त्याचे वर्षभरानंतर काय होते याचा अहवाल उद्यान विभागाकडून आजतागायत दिला गेलेला नाही. दरवर्षी एक लाख या हिशेबाने गेल्या दहा वर्षांत लावलेल्या दहा लाख झाडांमुळे मुंबईचे जंगलात रूपांतर होणे आवश्यक होते, असा टोला पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतील सदस्यही अनेकदा मारतात.