जोगेश्वरी-गोरेगावदरम्यानची घटना; मृतांत लहान मुलाचा समावेश
रेल्वेरूळ ओलांडणे धोकादायक आहे, अशी सूचना वारंवार करूनही शुक्रवारी जोगेश्वरी-गोरेगाव यादरम्यान रूळ ओलांडताना एका दाम्पत्याचा आणि त्यातील महिलेच्या चार वर्षांच्या भाच्याचा मृत्यू झाला. विरारकडे जाणाऱ्या जलद गाडीचा धक्का लागल्याने हे तिघे जागीच ठार झाले.
शुक्रवारी संध्याकाळी ४.१०च्या सुमारास जोगेश्वरी-गोरेगाव या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. संतोष सडासम (४०) आणि रेणुका सडासम (३५) हे जोगेश्वरी येथे राहणारे दाम्पत्य रेणुका यांच्या अंशु कोल्हे नावाच्या चार वर्षांच्या भाच्याला घेऊन रेल्वेरूळ ओलांडत होते. त्या वेळी बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाडीची धडक या तिघांना लागली. या तिघांना मोटरमन साजम आणि गार्ड कमावत या दोघांनी गाडीत घेत ४.४५च्या सुमारास कांदिवली स्थानकात लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी) दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
जोगेश्वरी व गोरेगाव या स्थानकांदरम्यान रेल्वेरूळ ओलांडताना अनेक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या (एमआरव्हीसी) ट्रेसपासिंग कंट्रोल अर्थातच रेल्वेरूळ ओलांडण्यास प्रतिबंध करण्याच्या प्रकल्पात या जागेचा समावेश आहे. मात्र रेल्वेही निव्वळ सूचना देते, मात्र जिथून लोकांना रूळ ओलांडल्याशिवाय गत्यंतर नसते किंवा रूळ ओलांडण्याचे प्रमाण जास्त असते, अशा भागात पादचारी पूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.