मराठी रंगभूमीवरील हरहुन्नरी अभिनेते नंदू पोळ यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. विविध छोटय़ामोठय़ा भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या कलाकाराला सहकलाकार मित्राने वाहिलेली आदरांजली..

नंदू पोळ म्हणजे हरहुन्नरी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. आपले खुजेपण हे त्याला कधी तापदायक वाटले नाही. सतत हसतमुख स्वभावाचा नंदू नाटकांमध्ये छोटय़ा भूमिका करीत असला तरी नाटकाच्या पाश्र्वसंगीतामध्ये त्याने स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले. माझा आणि त्याचा परिचय १९७२ पासूनचा. अर्थात, त्यापूर्वीही मी त्याला ओळखत होतो. मी शनिवार पेठेत राहायला. तर तो नारायण पेठेतील मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्याचे वडील नाटकामध्ये छोटीमोठी कामं करायचे. तर त्याची आई पाळणाघर चालवीत असे. ते पुण्यातील पहिले पाळणाघर असावे. नंदू ‘नूमवि’मध्ये असल्यापासून मला माहीत होता. पण, प्रत्यक्ष परिचय व्हायला ७२ साल उजाडले. त्याला संगीताची सजग अशी जाण होती. नंदू बासरी उत्तम वाजवीत असे.

‘पीडीए’मध्ये (प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन) आम्ही एकत्र होतो. दहावी झाल्यानंतर वडिलांनी त्याला बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरी मिळवून दिली. नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या प्रवेशाची कागदपत्रे तपासणे हे त्याचे सुरुवातीचे काम. त्यामुळे सर्व विद्यार्थिवर्गात नंदू लोकप्रिय होता. ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ संस्थेने ‘घाशीराम कोतवाल’ करण्याचे ठरविले तेव्हा त्या मूळ संचामध्ये वामनमूर्ती नंदू सर्वाचे लक्ष वेधून घ्यायचा. माझ्या ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’, ‘पडघम’ या नाटकांसह दहा-बारा नाटकांचे पाश्र्वसंगीत आणि ध्वनिसंयोजन अशी दुहेरी जबाबदारी नंदूने समर्थपणे सांभाळली. ‘शनिवार-रविवार’ आणि पुलंच्या ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकांसाठी नंदूने दिलेले पाश्र्वसंगीत उल्लेखनीय ठरले. ‘तीन पैशांचा तमाशा’ नाटकासाठी आम्ही पहिल्यांदा मिक्सर वापरला होता. हा मिक्सर नंदूच ‘ऑपरेट’ करीत असे. या नाटकाचे साडेतीनशे प्रयोग झाले. मोहन गोखले याने दिग्दर्शित केलेल्या ‘महापूर’ नाटकामध्ये नंदूने वापरलेली पं. कुमार गंधर्व यांची मधसूरजा रागातील ‘बचा ले मोरी माँ’ ही बंदिश इतकी चपखल होती ती त्यामुळे नाटक एका उंचीवर जाऊन पोहोचले. ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’च्या संयोजनामध्ये अण्णा राजगुरू आणि तात्या ठकार यांच्यासमवेत नंदू सदैव असायचा.

‘घाशीराम’चा १९८० मध्ये परदेश दौरा झाला तेव्हा नंदूने तेथून ध्वनिमुद्रणाची आयुधे खरेदी केली आणि पुण्यात आल्यानंतर स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. गणेशोत्सवातील देखाव्यांची माहिती देणारी ध्वनिमुद्रणे असोत किंवा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचाराची ध्वनिमुद्रिका, प्रत्येकाला सर्वप्रथम नंदूची आठवण होत असे. ‘सिंहासन’, ‘सामना’ आणि अगदी अलीकडे ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटांतून त्याने भूमिका केली. ‘शनिवार-रविवार’ नाटकाचे संगीत काही केल्या सुचत नव्हते. एके दिवशी अचानक नंदू शंकर-जयकिशन यांची ‘व्हॅझ’ ही चित्रपटसंगीतामध्ये वापरात न आलेली रागसंगीताची ध्वनिमुद्रिका घेऊन आला. त्यातले वेचक तुकडे घेऊन नंदूने या नाटकाचे संगीत केले होते.

नंदूचे वाचन अफाट होते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या चंद्रशेखर फणसळकर याने एकांकिका लिहिली होती. ती त्याने नंदूला वाचायला दिली. ‘सतीश, या मुलामध्ये मोठा नाटककार होण्याची क्षमता आहे. तू त्याला आपल्या कार्यशाळेत बोलावून घे’, असे सांगत नंदूने जणू मला फर्मानच सुनावले. त्यानुसार चंद्रशेखर आमच्या कार्यशाळेत आला आणि आज तो चांगला नाटककार म्हणून नावारूपाला आला याचे श्रेय नंदूलाच द्यावे लागेल. कमी उंची या व्यंगावर मात करून समाजात प्रसन्नपणे कसे वावरायचे याचा नंदू हा वस्तुपाठ होता. नाटकामध्ये आपल्याला कामं मिळणार नाहीत हे जाणून घेत त्याने ध्वनिमुद्रण आणि संगीत संयोजनाच्या क्षेत्रात स्वत:ची जागा निर्माण केली. ‘बीजे’तील डॉक्टरांच्या पिढय़ा, कर्मचारी, संभाजी उद्यान, रात्री अनिल पानवाले असे त्याचे अड्डे असायचे. कायम लोकांच्या गराडय़ात असलेला हरहुन्नरी नंदू आता आपल्यात नाही हे सहनदेखील होत नाही.

‘श्री गणराय नर्तन करी’ या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या मांदियाळीमध्य नंदू पोळ यांची वामनमूर्ती रसिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती.

Untitled-13