मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर अनेकदा ट्रक- टेम्पोचालकांना हक्काचे विश्रांतीस्थळ मिळावे, यासाठी खालापूर येथे महामार्गाच्या दोन्ही दिशांना ट्रक टर्मिनस बांधण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. त्यासाठी इच्छुकांकडून निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर प्रामुख्याने गेल्या दीड- दोन वर्षांत ट्रक-टेम्पोसारख्या जड वाहनांमुळे होणारे अपघात वाढले आहेत. काहीवेळा थकव्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने तर काहीवेळा डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाले. त्यात द्रुतगती महामार्गावरील वाहनांतील प्रवाशांना जिवास मुकावे लागले.
अशा घटना वारंवार घडल्याने ट्रक- टेम्पोचालकांना द्रुतगती महामार्गावर विश्रांतीसाठी, ताजेतवाने होण्यासाठी जागा नसल्याची बाब समोर आली होती. या पाश्र्वभूमीवर द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ रस्त्याच्या दोन्ही दिशांना ट्रक टर्मिनल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे प्रत्येक टर्मिनल सुमारे पाच एकर जागेवर उभारण्यात येणार असून एकावेळी एका टर्मिनलवर जवळपास १०० ट्रक थांबू शकतील. या ठिकाणी वाहन थांबवण्यासाठी जागा असेलच शिवाय चालकांना विश्रांतीही घेता येईल. त्याचबरोबर त्यांच्यासाठी खानपानाची सुविधाही असेल. त्यामुळे अतिप्रवासामुळे थकल्यास, झोप येत असल्यास ट्रक-टेम्पोचालकांना हक्काचे विश्रांतीस्थान मिळणार आहे. यातून अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.