घनदाट जंगल, हिरवेकंच डोंगर, त्यातून प्रसवणारे दुधाळ धबधबे, झुळझुळ वाहणारी नदी आणि उंच डोंगरावर असलेले रम्य शिवालय.. तुंगारेश्वर परिसर अवर्णनीय आहे. निसर्गाने भरभरून दान दिलेला हा परिसर शहरी वातावरणापासून दूर, शांत आणि प्रदूषणमुक्त असल्याने अनेक पर्यटकांची पावले या जंगल परिसरात भटकंती करण्यासाठी आणि तुंगारेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी वळतात.

तुंगारेश्वर महादेवाचे मंदिर उंच डोंगरावर असून भाविकांना पायपीट करून येथपर्यंत जावे लागते. घनदाट वनराईत वसलेल्या आणि शिवनामाने आकंठ बुडालेल्या या शिवधामाला श्रावणमासी भक्तांची अलोट गर्दी होते. मंदिराशेजारून वाहणारी नदी आणि लहान-मोठे धबधबे भिजऱ्या मनाला साद घालतात. या शिव मंदिराकडे आणि तुंगारेश्वर अभयारण्याकडे जाण्यासाठी वसई रोड स्थानकाबाहेरून रिक्षाची सोय आहे. मात्र रिक्षा आपल्याला तुंगारेश्वर फाटा येथे सोडते, तेथून निसर्गरम्य वातावरणात पायपीट करूनच या रम्य शिवालयाकडे जावे लागते. कच्च्या मातीच्या सडकेवरून जाताना मध्ये दोन वेळा ओढा (की नदी) लागतो. हा ओढा ओलांडूनच पुढे जावे लागते. एका ओढय़ावर दगडी पूल आहे, मात्र बरेच पर्यटक ओढा तुडवत पाण्यातूनच रमतगमत पुढे जातात. जंगलातील ही पायवाट हळूहळू डोंगर चढू लागते. तब्बल २१७७ फुटांवर वसलेले हे शिव मंदिर फार जुने आणि प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरात अनेक हारतुऱ्यांचे आणि चहा- नाष्टय़ाचे स्टॉल आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यास मंदिराचा देखणा नजारा समोर येतो.

प्रवेशद्वारापासून खाली पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराचे सभागृह मोठे व देखणे आहे. भिंतीविरहित या सभागृहाच्या मध्यभागी नंदी आहे, तर खांबांवर विविध देव-देवतांच्या मूर्तीचे कोरीवकाम आहे. गाभाऱ्यात काळय़ा पाषाणातील शिवलिंग आहे. शिवलिंगाचा खालचा भाग चांदीचा असून, शिवलिंगाभोवती नागाचे वेटोळे आहे. या मंदिरामागे नदी असून तेथील परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.

केवळ मंदिरामुळेच नव्हे, तर येथील जैवविवधतेमुळेही हा परिसर प्रसिद्ध आहे. जंगलाशी खऱ्या अर्थाने एकरूप व्हायचे असेल, तर एखाद्या जाणकारासोबत या जंगलात फेरफटका मारावा. अनेक प्रकारचे वृक्ष, विविध रंगांची फुलझाडे येथे पाहायला मिळतात. अनेक प्रजातींची रंगबेरंगी फुलझाडेही येथे पाहायला मिळतात. घनदाट जंगलात अनेक वन्यप्राणीही आहेत. मध्ये मध्ये एखाद्या माकडाचे वा सापाचे दर्शन होते.

पावसाळय़ात तर येथील डोंगरातून अनेक धबधबे प्रसवतात. तुंगारेश्वरचा प्रसिद्ध धबधबा तर पर्यटकांचे खास आकर्षण. जास्त धोकादायक नसलेल्या या धबधब्यात पर्यटक मनमुराद आनंद लुटतात. जंगलातील नदीतही पर्यटक भिजण्याचा आनंद घेतात.

कसे जाल? तुंगारेश्वर

  • ’ वसई रोड स्थानकापासून सातिवली व तुंगारेश्वर फाटा येथे रिक्षाने जाता येते. तेथून कच्च्या रस्त्याने चालत मंदिरापर्यंत जावे लागते.
  • ’ खासगी रिक्षा केल्यास थेट मंदिरापर्यंतही जाता येते.
  • ’ स्वत:चे वाहन असेल तर मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरून सातिवली येथील रस्त्याने तुंगारेश्वरला जाता येते.
  • ’ ठाण्याहून भिवंडी-वाडा रस्त्यावरून वज्रेश्वरी फाटा आहे. वज्रेश्वरी रस्त्यालाच पुढे तुंगारेश्वरला जाण्यासाठी मार्ग आहे.