दाव्होस येथील जागतिक आर्थिक परिषदेत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी भारतासाठी सकारात्मक वातावरण दिसून आल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात यापुढील काळात वीस हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. तसेच शेतकऱयांसाठी राज्यात ‘व्हॅल्यू चेन’ तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दाव्होस परिषदेत अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यात महाराष्ट्राच्या बाजूने कंपन्यांचा कल दिसून आल्याचे फडणवीस म्हणाले. दाव्होस दौऱयाबद्दल माहिती देण्यासाठी बुधवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दाव्होस दौऱयात महाराष्ट्राला मोठं यश मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱयांची ‘व्हॅल्यू चेन’ तयार करून यामध्ये या वर्षी १० लाख शेतकऱयांना समाविष्ट करण्यात येणार आहे आणि पुढील काळात हा आकडा २५ लाखांपर्यंत नेण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. या ‘व्हॅल्यू चेन’मध्ये १४ पिकांचा समावेश करण्यात आला असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. विशेष म्हणजे, मायक्रोसॉफ्ट कंपनी महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात दोन डेटा सेंटर उभारणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. अमरावती आणि औरंगाबाद शहारांनाही उद्योगाच्या दृष्टीने महत्त्व दिले जाणार असून अमरावतीत उद्योग उभारण्यासाठी एका जपानी कंपनीने तयारी दर्शवली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेखाली जनरल इलेक्ट्रीक कंपनी महाराष्ट्रात ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासोबतच टोरे इंटरनॅशनल, हिल्ती ग्रूप, सफरान, फोक्सवॅगन, खीमजी ग्रूप यासारख्या कंपन्या महाराष्ट्रात उद्योग करण्यास इच्छुक असल्याचेही देवेंद्र यांनी सांगितले. तसेच जे.पी.मॉर्गन, नेस्ले या कंपन्या आपला महाराष्ट्रातील उद्योग विस्तारित करण्यास तयार आहेत.