सुरुवातीला मी अभिनेता होतो म्हणून लोकांनी मला स्वीकारावे, अशा माझ्या भावना होत्या.. त्यांनी स्वीकारले, त्यांना मी आवडत होतो. त्यानंतर मी राजकारणात शिरलो. तेव्हा लोकांनी नेता म्हणून स्वीकारावे, अशी अपेक्षा सुरुवातीस होती.. ते मात्र चुकीचे होते, असे मला आज वाटते आहे. आपण लोकांना आवडेनासे झालो आहोत, ही जाणीव लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीसाठी अतिशय क्लेशकारकच नव्हे तर प्रसंगी अपमानास्पदही असते.. हे सांगताना  प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचा गळा दाटून आला.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या नासकॉमचे तीन दिवसीय वार्षिक अधिवेशन सध्या सुरू असून त्यातील एका सत्रामध्ये अमिताभ बच्चन यांची मुलाखत पार पडली.
माझ्या राजकारणातील प्रवेशानंतर मी लोकांसाठी खूप काही करण्याचा प्रयत्न केला. खरे तर जी मंडळी आपल्यावर प्रेम करतात, त्या लोकांची सेवा करण्याचे ते एक चांगले निमित्त असेल, असे मला वाटले होते. मात्र झाले वेगळेच. मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला पण बोफोर्स प्रकरणात झालेल्या खोटय़ा आरोपांनी माझ्या यशस्वीतेवर परिणाम केला. एरवी तुम्ही ज्या व्यवसायात असता त्यामध्ये तुमच्यावर आरोप होत असतात. पण तो तुमच्या व्यवसायाचा एक भाग असतो. इथे मात्र असे नव्हते. त्या आरोपांनी माझी प्रतिमा जणू काही टराटरा फाडण्याचाच प्रयत्न केला. त्यापूर्वी मी लोकप्रियतेचे शिखर गाठलेले होते. त्यानंतर आलेल्या या टप्प्यावर मग लोकांना आपण आवडत नाही, ही जाणीव अतिशय कटू होती. ती पटविणे अतिशय कठीण असते, हे मी अनुभवांती सांगू शकतो, असेही अमिताभ म्हणाले.
त्यानंतर एबीसीएलमध्येही कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. त्यातून सावरण्यासाठी छोटय़ा पडद्यावर केबीसी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वानीच त्याला विरोध केला होता. पण त्यावेळेस ती माझी गरज होती. गरज म्हणून जे केले ते नंतर क्लिक्  झाले.
प्रत्येक घटना ही बहुधा विधात्याच्या मनात असते आणि त्याच्या मनात कधीच वाईट गोष्ट येत नाही, असे म्हणतात.. याचा अर्थ तुमचे सारे काही चांगलेच होईल, असा असतो. फक्त हे सारे घडते तेव्हा आपल्याला या साऱ्याची कल्पना नसते इतकेच.. असे सांगत अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलाखतीला पूर्णविराम दिला.