राज्य सरकार मुंबई महापालिकेस आदेश देणार
मुंबई शहरातील घनकचऱ्याच्या विल्हेवाटीची गंभीर समस्या सोडविण्यासाठी महापालिका फारशी प्रयत्नशील नसल्याचे दिसून आल्यानंतर आता राज्य सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच प्रभागातच शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा ‘पुणे पॅटर्न’ मुंबईतही लागू करण्याचे आदेश शासनातर्फे लवकरच मुंबई महापालिकेस देण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार नगरविकास विभाग पुढील कारवाई करील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
मुंबई शहरात सध्या दररोज नऊ ते दहा हजार मेट्रीक टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे पुरेशी व्यवस्थाच नाही. या प्रश्नात हस्तक्षेप करीत कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत महापालिकेस आदेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट कशापद्धतीने लावावी याबाबत सरकारतर्फे महापालिकेस लवकरच काही मार्गदर्शक तत्वे दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने एक अभिनव प्रयोग राबविला असून तो तेथे कमालीचा यशस्वी ठरला आहे. त्यामुळे यापुढे नव्या इमारतींच्या बांधकामाना परवानगी देतांना ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यावर तेथेच प्रक्रिया करण्याची अट घालावी. तसेच मोठय़ा गृहसंकुलामध्ये विविध प्रयोजनार्थ मोकळ्या असणाऱ्या जागांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणारे छोटे प्रकल्प उभारण्याचे बंधन घालावे आदी सूचना सरकारकडून देण्यात येणार आहेत.

* पुणे महापालिकेप्रमाणेच मुंबईतही कचऱ्याचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक प्रभागात ओला व सुका कचरा वेगळा करून या कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करावी.
* शहातील काही प्रभागांमध्ये प्रायोगित तत्वावर ही योजना सुरू करावी आणि त्याचा अभ्यास करून टप्याटप्याने शहरात लागू करावी.