सहा दशकांची उद्योगपरंपरा असणाऱ्या विको उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि संचालक गजानन पेंढारकर यांचे गुरूवारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. परळ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मराठी उद्योगविश्वातील एक प्रयोगशील आणि सचोटीचे उद्योगपती म्हणून गजानन पेंढारकर यांची ख्याती होती. फार्मसीचे शिक्षण घेतल्यानंतर १९५७ मध्ये त्यांनी ‘विको’च्या माध्यमातून कारकीर्दीची सुरूवात केली.  त्यानंतरच्या काळात  ४४ वर्ष पेंढारकर यांनी विको समुहाचे अध्यक्षपद भुषविले होते. या काळात त्यांनी ‘विको’च्या आयुर्वेदिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्याप्रमाणावर नावलौकिक मिळवून दिला. आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अतिश्य परिश्रम केले होते.  आजघडीला ४० हून अधिक देशांमध्ये ‘विको’च्या उत्पादनांची विक्री होते.