मुंबईला पाणीपुरवठा करणारी ७२ इंचाची जलवाहिनी शनिवारी दुपारी पावणेतीन वाजता ठाण्यातील किसननगर येथे फुटली. त्यामुळे जलवाहिनीच्या दोन्ही बाजूने खेटून असणाऱ्या शेकडो झोपडय़ांमध्ये पाणी घुसून परिसर जलमय झाला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने अनेक झोपडय़ांमध्ये नागरिक अडकून पडले होते. त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. तसेच एक नागरिक जखमी झाला. दरम्यान, यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, संपूर्ण मुंबईत पालिकेने तातडीने वीस टक्के पाणीकपात केली आहे.
तानसा जलवाहिनी ८५ वर्षे जुनी असून, दर उन्हाळ्यात विविध ठिकाणी वाहिनी फुटण्याच्या घटना घडतात. मात्र ही वाहिनी नेमकी कशामुळे फुटली याबाबत पालिकेकडून अधिकृत कारण देण्यात आले नाही. साधारण रविवारी रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे मुंबईत वीस टक्के पाणीकपात तातडीने लागू केली असल्याचे जलअभियंता रमेश बांबळे यांनी सांगितले. वैतरणा वाहिनीतून अधिक पाणीपुरवठा होऊ शकल्यास पाणीकपातीची तीव्रता कमी होईल.
पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने किसननगरमध्ये पूरसदृश स्थिती झाली होती. सुमारे ७०० घरांमध्ये अडकलेल्या पाच हजार रहिवाशांना ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने आणि अग्निशमन दलाने बाहेर काढले.