इंधनावर एक टक्का व्हॅट, पाणी, वीज स्वस्तात

देशांतर्गत विमानसेवेला बळकटी मिळावी म्हणून केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील नऊ विमानतळांना विशेष दर्जा देण्यात आला असून, महाराष्ट्र सरकारने या विमानतळांना पाणी, वीज व अन्य पायाभूत सुविधांमध्ये भरीव सवलत दिली आहे. याशिवाय इंधनावर फक्त एक टक्का व्हॅट आकारला जाईल.

देशांतर्गत विमानसेवा अधिक सक्षम करण्याकरिता केंद्र सरकारने अलीकडेच ‘उडान’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारबरोबर झालेल्या करारानुसार दहा विमानतळांच्या देखरेखीकरिता विविध सवलती दिल्या जाणार आहेत.

या विमानतळांना सवलती

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, अमरावती, गोंदिया, नाशिक, नांदेड, सोलापूर या विमानतळांना राज्य शासनाकडून सवलती दिल्या जाणार आहेत. पुढील दहा वर्षे या विमानतळांवर इंधनासाठी फक्त एक टक्का व्हॅट आकारला जाईल. या विमानतळांच्या विकासासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली जाईल. रस्ते, बंदरे, मेट्रोसाठी मदत केली जाईल. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा मोफत दिली जाणार आहे. वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधा भरीव सवलतींमध्ये दिल्या जाणार आहेत.