कुठला अभ्यासक्रम किंवा क्षेत्र निवडायचे या बाबत दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेला गोंधळ वेळीच दूर करण्यासाठी दहावीच्या निकालपत्राबरोबरच त्यांचा करिअरविषयक कल स्पष्ट करणारे ‘अहवालपत्र’ (करिअर कौन्सिलिंग रिपोर्ट) देण्याची योजना पुढील शैक्षणिक वर्षांपासून राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.
शालेय बरोबरच वैद्यकीय आणि उच्च व तंत्रशिक्षण या शिक्षणाशी संबंधित सर्वच विभागांचे मंत्रीपद भूषविणाऱ्या तावडे यांच्या हस्ते ‘विद्यालंकार’ प्रस्तुत ‘लोकसत्ता- करिअर यशाचा’ या परिसंवादाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी करण्यात आले. प्रभादेवीच्या ‘रवींद्र नाटय़ मंदिरा’त शुक्रवारप्रमाणेच उद्या शनिवारीही या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी आणि बारावी नंतरच्या विविध करिअरविषयक मार्गाविषयी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ याद्वारे विद्यार्थ्यांना मिळत आहे. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, भारती विद्यापीठ, विद्यासागर क्लासेस आणि एमकेसीएल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, डोंबिवली नागरी सहकारी बँक कार्यक्रमाची ‘बँकिंग पार्टनर’ आहे.  
विचारवंत मार्क ट्वेन याने सांगितल्याप्रमाणे जीवन बदलवून टाकेल असा मार्ग दाखविणारी ‘खिडकी’ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उघडत असते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा ठरविण्यासाठी हे मार्गदर्शन उपयोगी पडेल, अशी अपेक्षा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना व्यक्त केली. तेच सूत्र पकडून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधतानाच तावडे यांनी शिक्षण विभागात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भविष्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांचाही आढावा घेतला. ‘दहावीच्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन शालेय स्तरावरच सरकारच्या पुढाकाराने उपलब्ध करून देणे ही खरेतर कठीण बाब आहे. परंतु, दहावीच्या वर्षांतच विद्यार्थ्यांची करिअरविषयक विचार प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे, याबाबत आम्ही लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार आहोत,’ असे तावडे यांनी सांगितले.
‘दहावीनंतर अभ्यासक्रम कोणता निवडायचा याचा पूर्वी फार ठोकळेबाज विचार केला जाई. दहावीला अमुक इतके गुण मिळाले की या शाखेला जायचे हे ठरलेले असायचे. पालकांच्या या भूमिकेत अद्यापि बदल झालेला नाही,’ असेही तावडे म्हणाले. तसेच, अमुक एक शाखा निवडली म्हणून तिलाच चिकटून राहिले पाहिजे असेही नाही. अभ्यासक्रमाबरोबरच दुसरे एखादे कौशल्य आत्मसात करण्याचा विचार करायला हवा. कारण, आजच्या काळात वेगवेगळ्या कामात कौशल्य असलेल्या मनुष्यबळाला भारताच नव्हे तर परदेशातही खूप मागणी आहे. त्यासाठी आपली संकुचित अभ्यास पद्धतीही बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आपण झापडबंद अभ्यास पद्धती निर्माण करण्यासाठी मंत्री झालो नसून त्या क्षेत्रात जमेल तितके बदल करण्याच प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यासाठी पदवी स्तरावर इंटर्नशीपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, या दृष्टीने बदल करण्याचा विचार आम्ही करतो आहोत, असे त्यांनी सांगितले. जीवनात यशस्वी कसे व्हायचे याचा मंत्र देताना स्वत:वरचा विश्वास ढळू देऊ नका आणि ‘अंथरुण पाहून पाय पसरा’या संकुचित मराठी म्हणीचा जप करण्याऐवजी आधी पाय पसरा आणि नंतर तितके अंथरुण जमवा. तसेच, हे करताना वेगळा विचार करण्याची सवय लावा, असा सल्ला त्यांनी दिला.

अनेकदा पालकच आपली स्वप्ने मुलांच्या माथी मारत असल्याने ती अधिक पिचतात. अशी ठोकळेबाज भूमिका असणाऱ्या पालकांचेच आधी समुपदेशन केले पाहिजे.
– विनोद तावडे, शिक्षणमंत्री