सुब कुछ ‘सिक्वल’ (बाकी इक्वल)
‘मराठीत साहित्यात सिक्वल का निर्माण होत नाहीत?’ या प्रश्नाचे उत्तर अजमावून पाहण्याच्या कल्पनेतून  mu03   ‘साहित्य सूची’चा हा सिक्वल विषेशांक तयार झाला आहे. त्यासाठी जी. एं.ची ‘कैरी’, नेमाडय़ांची ‘कोसला’ आणि बोकीलांची ‘शाळा’ या तीन विषयांच्या सिक्वलविषयीची स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. त्यात बक्षीस मिळवलेले या अंकातले सहाही सिक्वल लेख नितांत वाचनीय आहेत. त्या जोडीला नेमाडय़ांची मुलाखत आणि गणेश मतकरी यांच्या ‘सिनेमाचे सिक्वल आणि कादंबरीचे ‘सिक्वल’ या विषयावरील खुमासदार चौकटी आहेत. याशिवाय आनंद जोशी, सुबोध जावडेकर, भारत सासणे, शुभा गोखले, कविता महाजन, रविमुकुल, मंगला आठलेकर, रवींद्र शोभणे यांचे इतरांच्या आणि स्वत:च्या सिक्वलविषयीच्या लेखांची भट्टीही जमली आहे.
साहित्य सूची, अतिथी संपादक : संजय भास्कर जोशी, पृष्ठे : ३३०,  मूल्य : १०० रुपये.

मुला-मोठय़ांचा ज्ञानसवंगडी
वयम्चा दिवाळी अंक म्हणजे लहानग्यांसोबत मोठय़ांसाठीही माहिती आणि मनोरंजनाचा खजिनाच. मुलाखती, ललित लेख, कथा, देशोदेशीच्या शाळा, देणे मुलांचे, मंगळयान अशा सहा विभागांमध्ये mu02विभागलेला हा अंक वैविध्यपूर्ण असा आहे. मंगळयान या विभागात डॉ. बाळ फोंडके, मोहन आपटे या मान्यवरांबरोबरच ऋता सबनीस यांचा लेख आहे. बाळ फोंडके यांनी मंगळयानाचा प्रवास उलगडून दाखवला आहे. तर खगोलतज्ज्ञ मोहन आपटे यांनी मंगळयानाची वैशिष्टे सांगतानाच मंगळाचे आकाशातील उपग्रह, मंगळावरून सूर्यग्रहण कसे दिसते, मंगळावरून पृथ्वीचे दृश्य कसे दिसते अशा अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हत्ती-मित्र आनंद शिंदे, ‘यलो’ गर्ल गौरी गाडगीळ आणि केतकी माटेगावकर आणि तिचे आईबाबा यांच्या मुलाखती वाचनीय झाल्या आहेत. मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, मुकुंद टाकसाळे यांनी लिहिलेले ललित लेख मुलांना हसवणारे, काही तरी शिकवून जाणारे आहेत. ज्येष्ठ कथाकार सुबोध जावडेकर, राजीव तांबे, डॉ. आनंद जोशी, मंजुश्री गोखले यांसारख्या लेखकांच्या सुंदर कथांचा समावेशही या अंकात आहे. मुलांबरोबरच मोठय़ांनीही वाचावा असा हा दिवाळी अंक आहे.
वयम् ,  संपादक :  शुभदा चौकर, पृष्ठे – १६३ मूल्य-९० रुपये

कुटुंबासाठी वाचनफराळ
खास महिलांसाठीचा अंक असला, तरी कुटुंबातील सर्वासाठी चविष्ट वाचनफराळ वाढून ठेवणारा अंक म्हणून मैत्रीणची ओळख आहे. कर्तृत्वशिखरांवर पोहोचलेल्या स्त्रियांच्या कला-छंदांविषयीचा ‘रंग माझा वेगळा’ हा mu04अंकातील विभाग मोठा कुतूहलशामक आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, स्वरूप संपत, स्मिता जयकर, निवेदिता जोशी सराफ आदी व्यक्तिमत्त्वांच्या वेगळ्या रंगांचा परिचय या निमित्ताने झाला आहे. कवी प्रवीण दवणे, सलील कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या ललितबंधांसोबत डॉ. संदीप केळकर यांचा विशेष लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. रत्नाकर मतकरी, शिल्पा नवलकर, दीप्ती काबाडे, प्रियंवदा करंडे आदींनी अंकाचा कथाविभाग सजविला आहे.  
मैत्रीण, संपादक : वर्षां सत्पाळकर, पृष्ठे : १६४, किंमत. १२० रुपये
 
अध्यात्म आणि मानसोपचार
महाप्रभू श्रीवल्लभाचार्य या पुष्टीमार्गी वैष्णव संतांचे डॉ. प्र. न. जोशी यांनी लिहिलेले सविस्तर चरित्र तर डॉ. अरविंद संगमेनरकर, भालचंद्र देशपांडे, अजित पुरोहित या तिघांच्या पारितोषिकप्राप्त कथा या अंकात mu05आहेत. याशिवाय पराग घळसासी, तेजस्विनी पंडित, जयश्री तेराणेकर यांच्या कथाही यात आहेत. अध्यात्म आणि मानसोपचार या विभागात अध्यात्म आणि दैनंदिन जीवन या विषयावर डॉ. राजेंद्र बर्वे आणि  गुरुनाथ मुंगळे महाराज यांच्या मुलाखतीदेखील आहेत. डॉ. व. दा. भट यांचा ‘गगनी लयो पवन किजे’, स्वामी सवितानंद यांचा ‘श्रीचण्डीपाठ’, स्वानंद पुंड यांचा ‘समस्त देवता स्थापित श्रीविघ्नेश्वर- ओझर’, डॉ. वा. ल. मंजूळ यांचा ‘महिला वेदाध्ययन आणि पौरोहित्य’ आदी लेखांचा समावेश आहे.
प्रसाद, संपादक-उमा बोडस, पृष्ठे – १७६, मूल्य- १०० रुपये

वैश्विक भटकंतीचा वाटाडय़ा
खर्चीक पर्यटन-मौजेची ठिकाणे किंवा खास स्वस्तातली भटकंतीची माहिती देणाऱ्या टीव्ही वाहिन्यांचा सुळसुळाट आज झाला आहे. तरी दिवाळीकाळात मिलिंद गुणाजी यांच्या ‘मस्त भटकंती’ अंकाचा वाचकवर्गmu06 वाढतच आहे. यंदा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांचा वेध ‘मस्त भटकंती’ने घेतला आहे. कोलोरॅडोजवळील ‘गार्डन ऑफ गॉड्स’ सुळक्यांची लाली विजय पाडळकर यांच्या शब्दबंधातून उमटली आहे, उमा हर्डीकर यांनी युरोपातल्या अपरिचित वाटांची ओळख करून दिली आहे, पुष्पा जोशींनी वाळूच्या प्रदेशातील गंमत उलगडली आहे, जर्मनीतील कॉबलेंझ, पवनचक्क्यांचं हॉलंडमधील गाव झानशान, चीन आणि तिबेट यांना जोडणारी स्काय ट्रेन अशा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांचा वाटाडय़ा म्हणून यंदाच्या अंकाकडे पाहावे लागेल. देशांतर्गत स्थळांमध्ये हंपीजवळील दारोजी अस्वल अभयारण्य आणि गेंडय़ांसाठीचं गुवाहाटीजवळील पाबितोरा अभयारण्यावर मिलिंद आमडेकर यांनी लिहिले आहे. पर्यावरणासाठी झटणाऱ्या व्यक्तींवर ‘ग्रीन हिरोज्’ हा स्वतंत्र आणि माहितीपूर्ण विभाग देण्यात आला आहे.
भटकंती ,अतिथी संपादक : मिलिंद गुणाजी, पृष्ठसंख्या : १६४, किंमत – रु. १२०/-

सर्वसमावेशक भ्रमंतीचा वेध
‘युनिक फिचर्स’ तर्फे प्रकाशित झालेल्या मुशाफिरी या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे सर्वसमावेशकता. परदेशातील अनवट वाटा, शेजारी देशांची भटकंती, शहरांचा फेरफटका, असेही प्रवास, देशातील भटकंती, mu07खाद्यसंस्कृती आणि महाराष्ट्रातील पर्यटनवैभव अशा सात भागांमध्ये हा अंक विभागला गेला आहे. गोवा, धाम आणि हैदराबादची खाद्यसंस्कृती, पुदुच्चेरी आणि जर्मनीच्या पश्चिम किनारी असलेल्या शहरांचा वेध या लेखांद्वारे तेथील वेगळेपण अधोरेखित करण्यात आले आहे. मेळघाट जंगलाविषयीचा आणि बिहारमधील बौद्ध संस्कृतीची माहिती देणारा लेखही असेच उल्लेनीय आहेत. मात्र यशोदा वाकणकर यांनी लिहिलेला ‘सायकलीबरोबरचा प्रवास’ हा लेख एकाच वेळी माहितीपूर्ण आणि त्याबरोबरच अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. एकूणच संपूर्ण अंक वाचनीय आणि पर्यटनप्रेमींसाठी मेजवानी ठरावा असाच आहे.
मुशाफिरी, संपादक – सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, युनिक फिचर्स, पृष्ठे : १५२, मूल्य : १००
 
वैविध्यपूर्ण लढय़ांविषयी
विविध क्षेत्रांतील मंडळींनी त्यांच्या आयुष्यात दिलेल्या लढय़ाविषयी यंदाच्या ‘आरोग्य संस्कार’च्या दिवाळी अंकात वाचायला मिळते. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी पोलिओशी आणि समाजाच्या मानसिकतेशी दिलेल्या mu08लढय़ापासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केलेला संघर्ष या अंकात वाचायला मिळतो. या लढय़ांविषयी वाचताना तो केवळ वाचून सोडून द्यावा असं वाचकाला वाटू नये याची काळजी घेत, त्या लढय़ांमधून वाचकांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न हा अंक करतो. अच्युत गोडबोले, अनिल अवचट, राम नाईक, भीष्मराज बाम, वंदना अत्रे, इरोम शर्मिला, धनराज पिल्ले, चंद्रकांत काकोडकर आदींनी त्यांच्या आयुष्यात दिलेले लढे या अंकात आहेत. संतोष पाठारे यांनी चित्रपटांमधल्या लढय़ांविषयी जसं लिहिलं आहे, तसंच चित्रपटात शोभेल अशा प्रसंगांसारखा दत्ता श्रीखंडे यांनी व्यसनाधीनतेशी दिलेल्या लढय़ाची कहाणीदेखील यात आहे. लेखकाच्या स्वातंत्र्यावर कोणी कधी घाला घालू नये म्हणून दहा हजार रुपये खर्च करून आणि सहा वर्षांचा मनस्ताप सहन करून सरकारकडून पंचवीस रुपये परत घेणाऱ्या काकोडकरांनी जो लढा दिला त्याविषयी तसंच भीष्मराज बाम यांनी पाठीच्या दुखण्याशी दिलेला लढादेखील यात आहे.
आरोग्य संस्कार, संपादक- डॉ. यश वेलणकर, पृष्ठे – १२६, मूल्य- १०० रुपये