पश्चिम रेल्वेची योजना

रेल्वेमार्गावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा पत्र्याचे टिन ही भारतीय रेल्वेवरील मोठी समस्या आहे. पश्चिम रेल्वेने या समस्येचे उत्तर स्वत:पुरते शोधले असून त्यात प्रवाशांचा फायदा करून देण्याचीही योजना आखली आहे. या रिकाम्या बाटल्या एका यंत्राच्या माध्यमातून नष्ट करण्याची योजना पश्चिम रेल्वेने आखली असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर दहा स्थानकांवर ही यंत्रे बसवण्याची योजना आहे.

‘स्वच्छ भारत पुनर्वापर यंत्र’ असे या यंत्राचे नाव असून वोक्हार्ट फाऊंडेशनच्या सहकार्याने ही यंत्रे पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर ही यंत्रे बसवण्यात येतील. सर्वप्रथम हे यंत्र चर्चगेट स्थानकावर बसवले जाईल. या यंत्रात पाच हजार बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची क्षमता आहे. चर्चगेटप्रमाणे इतर नऊ स्थानकांवर ही यंत्रे बसवण्यात येण्याची योजना असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी स्पष्ट केले.

बारकोड असलेल्या कोणत्याही प्लॅस्टिक बाटल्या किंवा पत्र्याचे टिन या यंत्रात टाकता येतील. बाटल्या यंत्रात टाकल्यानंतर प्रवाशांसमोर यंत्राच्या एलईडी स्क्रीनवर काही पर्याय दिसतील.

त्यात यंत्र उत्पादन करणाऱ्या कंपनीचे सहकार्य असणाऱ्या काही दुकानांतील वस्तूंवर सवलत, मोबाइल ई-वॉलेट आदी पर्याय प्रवाशांना निवडता येतील. तसेच यंत्रात पुनर्वापर झालेल्या बाटल्यांमधील वा टिनमधील घटकांपासून कपडे, धान्याच्या गोणी आदी वस्तू तयार करता येतील.