मुंबई : लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी २० मे रोजी ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात आल्या असून गेल्या दोन दिवसांत ८,०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. एकूण २,७५२ पोलीस अधिकारी, २७,४६० पोलीस अंमलदार, ६,२०० होमगार्ड, ०३ दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), ३६ केंद्रिय सुरक्षा दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी १६ मेपासून आतापर्यंत विविध कायद्याअंतर्गत ८,०८८ नागरिकांवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच, मतदान केंद्र परिसराच्या १०० मीटर परिसरात आणि मतदान केंद्राच्या आत मोबाइल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा >>>मुंबई: करबुडव्यांच्या २४ मालमत्तांवर जप्ती, शुभदा गृहनिर्माण संस्थे

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरलेल यंत्रणा नेण्यास बंदी आहे. याशिवाय परिसरात बॅनर, ध्वनीक्षेपक, मेगोफोनचा वापर करण्यासही बंदी आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला. हे आदेश २० मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. याशिवाय मतदान केंद्र, परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणतीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अमलबजावणी काटेकोरपणे होईल. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

१० कोटींहून अधिक संशयीत रकमेवर कारवाई

निवडुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून १० कोटी रुपयांहून अधिक संशयित रक्कम मुंबईत सापडली. निवडणूक आयोगाचे भरारी पथक व पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये ही रक्कम सापडली होती. त्यातील बहुसंख्य रकमेची माहिती प्राप्तीकर विभागाला देण्यात आली होती. घाटकोपर, दादर, पवई अशा विविध सात ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये ही रक्कम सापडली होती. त्याबाबत कोणतेही ठोस कागदपत्र सादर करण्यात आले नव्हते.

Story img Loader