राज्यातील बडय़ा दूध डेअऱ्या रसायनेमिश्रित दुधाची विक्री करत असल्याचे उघड होऊनही ही भेसळ रोखण्यासाठी काहीच पावले न उचलणाऱ्या राज्य सरकारला न्यायालयाने गुरुवारी फटकारले.
पुणे, सातारा, मुंबई व अन्य शहरांमध्ये रसायनमिश्रित दूध विकण्यात येते. दुधात सर्रास भेसळ केली जात असतानाही शासनातर्फे मात्र दुधाची चाचणी केली जात नाही, असा आरोप ‘आरोग्य सेवा’ या स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिकेद्वारे केला आहे. छापा टाकण्यात आलेल्या २२ डेअऱ्यांची नावेही उघड करण्यात आलेली नसल्याने ती उघड करण्याची मागणी याचिकादारांनी केली आहे.
न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने दूध पॅक केले जाताना प्रत्येक पॅकची चाचणी केली जाते का, अशी विचारणा न्यायालयाने केली. परंतु मनुष्यबळाअभावी प्रत्येक पॅकची चाचणी करणे शक्य नसल्याचे मात्र टोल नाक्यांवर चाचणी केली जात असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यानंतर प्रत्येक डेअरीमध्ये मशीन आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर सरकारकडून नकारात्मक उत्तर येताच न्यायालयाने सरकारला चांगलेच धारेवर धरले.
प्रत्येक डेअरीमध्ये दूध चाचणी करणारी यंत्रणा बसवा, हे सांगण्याचे काम संबंधित विभागाचे आहे. प्रत्येक वेळी आदेश दिल्याशिवाय सरकार काहीच काम करू शकत नाही का, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले.