अरबी समुद्रातील वातावरणाचा ‘मूड’ अचानक बदलल्यामुळे कालपर्यंत घामाच्या धारांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी भाऊबिजेच्या दिवशी अनपेक्षितपणे आल्हाददायक वातावरणाबरोबरच पावसाच्या थेंबांची रांगोळी अनुभवता आली. दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे शनिवारी पश्चिम किनारपट्टीवरील वातावरण ढगाळ झाले आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील तापमानात दोन ते तीन अंशांनी घसरण झाली होती. काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या.
अरबी समुद्रात मुंबईपासून १४०० किलोमीटर पश्चिम-नैॠृ त्येकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आता तीव्र स्वरूपाचा झाला असून पुढील २४ तासांत त्याचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ दोन दिवसांत दक्षिण ओमान आणि येमेनवर धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केरळमध्येही मेघगर्जनांसह मुसळधार पाऊस कोसळेल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे पुढील २४ तासात पावसाच्या आणखी सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. परंतु, त्याआधीच शनिवारी काही ठिकाणी पावसाच्या थंडगार थेंबांनी रस्त्यारस्त्यांवर रांगोळी रेखाटली होती. त्यातून आल्हाददायक वाऱ्यांमुळे भाऊबिजेकरिता घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला.
भाऊबिजेच्या दिवशी लोकल, बसमध्ये जरा जास्तच गर्दी असते. परंतु, वातावरणात हवेची झुळूक आल्याने एरवी खचाखच गर्दीतून निथळत्या घामाच्या धारांमध्ये करावा लागणारा हा प्रवास काहीसा आल्हाददायक बनला. त्यामुळे, सणासुदीला बाहेर पडलेल्या मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पावसाच्या सरींची शक्यता
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठावाडा येथे ढगाळ वातावरण झाले असून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील २४ तास आकाश अंशत: ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाच्या सरी कोसळतील.
कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, वेधशाळा.