धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभी असलेली महिला चोरटय़ांच्या हल्ल्यात खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री कळवा स्थानकाजवळ घडली. गायत्री चंद्रशेखर मोहिते (२७)असे या महिलेचे नाव असून तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
टिटवाळा परिसरात राहणाऱ्या गायत्री मोहिते यांचे माहेर ठाणे शहरात आहे.  बुधवारी सायंकाळी  ठाण्यात जाण्यासाठी त्या लोकलमध्ये चढल्या.   त्या लोकलच्या दरवाज्याजवळ उभ्या होत्या. लोकल ठाणे दिशेने रवाना होताच चोरटय़ाने त्यांच्या हातातील मोबाइल खेचण्यासाठी हल्ला केला. त्यामुळे त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. प्रवाशांनी धक्का देणाऱ्या तरूणाला धरून पोलीसांच्या ताब्यात दिले.