विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांचे मत

भाजप व काँग्रेस हे दोन्ही मोठे राष्ट्रीय पक्ष स्वतंत्र विदर्भ किंवा इतर लहान राज्य देऊ शकत नाही. ही राज्ये हवी असल्यास प्रत्येकाला स्वतंत्र राजकीय शक्ती उभारावी लागेल. या पक्षाने आपला पराभव शक्य असल्याचे पटल्यावरच ही राज्ये मिळू शकतात, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता व नवराज्य निर्माण संघाचे अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. नागपूरला नवराज्य निर्माण महासंघाच्या प्रथम अधिवेशनाच्या निमित्याने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आपले शत्रू आहेत. या पक्षांना कुणामुळे आपला जय-पराभव शक्य असल्याचे पटल्यावरच ते विदर्भासह इतर लहान राज्य तयार करण्याचा विचार करतील. भाजप हा पक्ष सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दोघेच चालवत आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्यावरही ते स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ शकत नाहीत. त्यामुळे लहान राज्यांची मागणी पूर्ण करण्याकरिता स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांकडून तर दिल्लीस्तरावर नवराज्य निर्माण संघाकडून दबाव निर्माण केला जाईल. देशात लहान राज्यांच्या विषयांवर इतर सर्व पक्षांचे समर्थन मिळवल्या जाईल.

स्वतंत्र राज्याच्या मुद्यावर निवडणूक लढण्याची गरज आहे. हे पक्ष जिंकणे किंवा हारणे हे महत्त्वाचे नाही. या पक्षाची ताकद वाढल्यास ते कुणाला जिंकवणे किंवा हरवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. संघाकडून नवीन राज्य निर्माण करण्याकरिता धोरण काय?, याकरिता काही निकष निश्चित होणार काय? हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २६ ऑक्टोबरला भेटीकरिता मागितलेल्या वेळी विचारल्या जाईल, असे श्रीहरी अणे म्हणाले.

राजा बुंदेल म्हणाले की, सरकारची नवीन राज्य निर्माण करण्याची परिभाषा काय? हेच कळत नाही. तेलंगणा राज्यासाठी १ हजार मृत्यू झाल्यामुळे हे राज्य दिले, की छत्तीसगडची मागणी नसतांनाही ते दिले हे कळायला मार्ग नाही. सरकारकडून प्रांतवार, संस्कृती, भाषावार राज्याबाबतच्या व्याख्येबाबतही संभ्रम असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक लढताना लोकप्रतिनिधींकडून स्थानिक नागरिकांना वेगळेच आश्वासन दिल्या जाते. निवडणूक झाल्यावर ते दिल्लीत स्वतच्या पक्ष व नेत्यांच्या दबावात वेगळीच भाषा बोलतात. त्यावरून ते दुतोंडी असल्याचे दिसते. जांबुवंतराव धोटे व चंद्रशेखर राव यांच्यासारखे निवडक नेतेच त्याला अपवाद असतात. सध्या निवडणूक लढणे खूप कठीण झाले आहे, असे मत राजा बुंदेल यांनी व्यक्त केले.