भाजप, काँग्रेसकडून सर्वच जागांसाठी मुलाखती

प्रथम एकला चलोरेचा नारा आणि नंतर युती-आघाडीचा घोळ असे निवडणुकीच्या वेळीस दिसणारे चित्र याही वेळी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरूआहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी सर्वच प्रभागासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याने युती-आघाडी झाल्यास इच्छुकांची समजूत घालायची कशी, असा प्रश्न या दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांपुढे निर्माण होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने युती आणि आघाडीचा विषय संपुष्टात आला होता. त्यामुळे  महापालिकेच्या निवडणुकाही स्वबळावर लढण्याची तयारी भाजप आणि काँग्रेसने एक वर्ष आधीपासून सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती तुलनेने भाजप आणि काँग्रेसपेक्षा मर्यादित असल्याने भाजप आणि काँग्रेसने सुरुवातीपासूनच ‘एकला चलोरे’ची भूमिका ठेवली आहे.

मात्र, पालिका निवडणुकीत राज्यपातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसल्याने हे दोन्ही पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत एकत्रित येण्याच्या मन:स्थितीत आहे, दुसरीकडे मुंबईत भाजपला शिवसेनेशी जुळवून घ्यावेच लागणार आहे. त्यामुळे सध्या युती-आघाडीचे वारे वाहू लागले आहे. मात्र, तत्पूर्वी या दोन्ही पक्षांनी सर्वच प्रभागात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ज्यांनी मुलाखती दिल्या ते कामालाही लागले आहेत. त्यांचा जनसंपर्क वाढला आहे.

अशावेळी युती-आघाडी झाली तर कोणत्या जागा सोडायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यमान नगरसेवक आणि गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारा पक्ष हे सामान्यपणे जागा वाटपाचे निकष असतात. हा निकष लक्षात घेतला तर राष्ट्रवादीला किमान १२ ते १५ जागा काँग्रेसला सोडाव्या लागतील. या सर्व ठिकाणी काँग्रेसने एक वर्षांपासून कार्यकर्त्यांना कोमाला लावले असून काहींना शब्दही देण्यात आला आहे. अशीच स्थिती शिवसेनेची आहे. २०१२ मध्ये युतीत शिवसेनेला १२ जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी सहा जागा त्यांनी जिंकल्या. दोन जागांवर अपक्ष जिंकले पण त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली नव्हती म्हणून ते अपक्ष लढले होते. मागच्या इतक्याच जागा शिवसेनेने मागितल्या तरी भाजपची अडचण होणार आहे. पाच वर्षे या भागात काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालायची कशी, असा प्रश्न नेत्यांपुढे निर्माण झाला आहे.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक पातळीवरचे नेते युती-आघाडीला विरोध करीत असले तरी राज्यपातळीवर झालेला निर्णय मान्य करण्याशिवाय स्थानिक नेतृत्वाला पर्याय नाही हे यापूर्वी दिसून आले आहे. असे झाल्यास स्थानिक पातळीवर जागा वाटप करताना कोणत्या जागा मित्र पक्षाला द्यायचा असा पेच या दोन्ही पक्षांना भेडसावणार आहे. सोडलेल्या जागांवर ज्या इच्छुकांना शब्द दिला होता त्याची समजूत कशी काढायची याचाही विचार आता नेत्यांना करावा लागणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते व महापालिकेतील पक्षाचे गटनेते वेदप्रकाश आर्य युतीच्या संदर्भात म्हणाले की, आम्हाला मुस्लीम लिगने पाठिंबा दिला आहे आणि पुढच्या काळात इतरही पक्ष जुळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जागा वाटप करताना सन्मानजनक तोडगाच निघायला हवा. आघाडी व्हावी अशी सर्वाचीच इच्छा आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही २९ जागा लढलो होतो. सहा जिंकल्या व तेवढय़ाच जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.

शिवसेनेचे नेते बंडू तळवेकर म्हणाले, २०१२ मध्ये आम्ही सहा जागा जिंकलो असलो तरी चुकीच्या उमेदवारी वाटपामुळे आम्ही तेवढय़ाच हरलो, यावेळी अशी चूक नेतृत्वाने न करता नगरसेवकांच्या मताने प्रभागात उमेदवारी दिली तर सेनेची संख्या तिप्पटीवर जाईल.