चर्चेविनाच महत्त्वाच्या विषयांना मंजुरी, सभा तहकूब

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात बँकांसमोर पैसे काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात रांगा लागल्या आणि त्यात काही शहरात बँकांसमोरच लोक मृत्युमुखी पडले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी, अशी मागणी करीत विरोधकांनी दिलेल्या या प्रस्तावावरून सभागृहात गोंधळ झाला. या गोंधळातच विषय पत्रिकेवरील अनेक महत्त्वाचे विषय चर्चा न करता मंजूर करण्यात आले आणि सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.

एरवी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरून गोंधळ होतो. गुरुवारी मात्र श्रद्धांजली अर्पण करण्याच्या विषयावरून नोटाबंदीचा निर्णय चांगलाच गाजला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या आधी महिन्याभरात ज्या लोकांचे निधन झाले त्यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण केली जाते, त्याप्रमाणे सभा सुरू झाल्यानंतर महापालिका सचिवांनी गेल्या महिन्याभरात ज्यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अभिनंदन प्रस्ताव घेण्यात आला आणि प्रश्नोत्तराचा सुरू  होताच विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात बँकासमोर रांगेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी अशी मागणी केली.

महापौर प्रवीण दटके यांनी श्रद्धांजली संदर्भातील प्रस्ताव उशिरा मिळाल्याचे सांगून त्यावर बोलणे टाळले. मात्र, महापौरांच्या उत्तराने विरोधी पक्षाचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. बँकेसमोर मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आधी श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू करावा, अशी मागणी करीत घोषणा देणे सुरू केले.

सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी विरोधकांचा गोंधळ सुरू असताना विषयपत्रिकेला सुरुवात करण्याची सूचना केल्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. त्या गोंधळातच महापौरांनी विषयपत्रिकेवरील विषय पुकारले आणि त्याला सभागृहात एकमताने मंजुरी देत सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.

सभेपूर्वीच प्रस्ताव दिला

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात बँकासमोर नागरिकांच्या रांगा लागल्या, त्यात काही शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी असा प्रस्ताव सभा सुरू होण्याच्या दोन तासापूर्वी महापालिका सचिव आणि महापौरांना देण्यात आला होता. मात्र, श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नाही. या प्रश्नावर महापौर आणि प्रशासन असंवेदनशील असून नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणे जाणूनबुजून टाळले.

विकास ठाकरे , विरोधी पक्षनेते, महापालिका

प्रस्ताव माझ्यापर्यंत आलाच नाही

विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी श्रद्धांजलीबाबत दिलेले पत्र महापालिका सचिवांना उशिरा मिळाले. मात्र, माझ्यापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे त्यांनी दिलेला श्रद्धांजलीचा प्रस्ताव आला नाही. त्यांनी आता प्रस्ताव द्यावा तो पुढच्या सभेत आणला जाईल आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषयावरून विरोधकांनी गोंधळ घातला आहे. आमची सर्वच विषयांवर चर्चा करण्याची तयारी होती. मात्र, विरोधकांना चर्चा करायची नाही आणि केवळ गोंधळ घालायचा असे त्यांनी ठरविले असेल तर आमच्यासमोर पर्याय नाही.

प्रवीण दटके , महापौर, महापालिका