गुंड पवन पवारला प्रवेश दिल्यामुळे संपूर्ण राज्यात टीकेचे धनी ठरलेल्या भाजपने या बाहुबलीची दहशत असणाऱ्या नाशिकरोड परिसरात महापालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर बाजी मारत मित्रपक्ष सेनेसह पालिकेतील सत्ताधारी मनसे आणि काँग्रेस आघाडीला हादरा दिला. महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले. त्यात सर्वाना धोबीपछाड देण्यात यशस्वी झालेल्या भाजपने दोन वर्षांत उपरोक्त भागात केलेल्या विकासकामांमुळे हे यश दृष्टिपथास आल्याचा दावा केला. दुसरीकडे या निवडणुकीत सत्तेचा वापर, धनशक्ती आणि गुंड प्रवृत्ती या अनिष्ट प्रथांना भाजपने जन्म घातला असून ही बाब शहराची सुरक्षितता धोक्यात आणणारी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
नाशिकरोड विभागातील ३६ आणि ३५ प्रभागांतील दोन जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी मतमोजणी पार पडली. त्यात ३५ ब प्रभागात भाजपच्या मंदाबाई ढिकले यांनी (१९४६) शिवसेनेच्या डॉ. वृषाली नाठे यांना पराभूत केले. या ठिकाणी मनसे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस आघाडीचा उमेदवार थेट चवथ्या क्रमांकावर फेकले गेले. प्रभाग ३६ मध्ये भाजपच्या सुनंदा मोरे यांनी (१९३७) मते मिळवत काँग्रेस आघाडीचे शशी उन्हवणे यांचा पराभव केला. या ठिकाणी सेना तिसऱ्या तर मनसे चौथ्या क्रमांकावर राहिली. पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीला केवळ सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आगामी निवडणुकीची रंगीत तालीम यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी ही पोटनिवडणूक गांभीर्याने घेतल्याने कमालीची चुरस निर्माण झाली. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले. परंतु भाजप सर्वाना पुरून उरल्याचे निकालाने स्पष्ट झाले. प्रभाग ३५ मध्ये भाजप उमेदवार अवघ्या १९८ मतांनी विजयी झाला. सेनेच्या उमेदवाराने चिवट झुंज दिली. परंतु प्रभाग ३६ मध्ये सेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.
ही निवडणूक मुख्यत्वे गाजली ती, गुंड पवन पवारला भाजपने दिलेल्या प्रवेशावरून. उमेदवारांच्या प्रचार कार्यालय उद्घाटनात पवारला भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश देण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्याचा खून, खंडणी या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पवारला प्रवेश दिल्यावरून शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी भाजपवर टीकेची झोड उठविली. इतकेच नव्हे तर, भाजपच्या एका गटाने या प्रवेशाला आक्षेप घेऊन शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप व त्यांच्या गटाने पक्ष ‘हायजॅक’ केल्याचा आरोप करत अंतर्गत मतभेद उघड केले. आगामी पंचवार्षिक निवडणूक राज्यातील सत्ताधारी सेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे. या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने तिचे महत्त्व वेगळेच होते. या सर्व घडामोडींमुळे पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष होते. त्यात भाजपने विजय संपादित करत सर्वाना गारद केले.

मनसे स्पर्धेतून बाद
गेल्या काही महिन्यांपासून गळती लागलेल्या पालिकेतील सत्ताधारी मनसेला पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. सत्ताधारी असूनही मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरही राहू शकले नाही. एका जागेवर तिसऱ्या तर दुसऱ्या जागेवर मनसेचे उमेदवार थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. आगामी निवडणुकीत मनसेपुढे काय वाढून ठेवलेले आहे, त्याची झलक या निकालाने दिल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.

विकासकामांमुळे यश
मागील दोन वर्षांत भाजपने या प्रभागांमध्ये जी विकासकामे केली, त्यावर मतदारांनी विश्वास ठेवून ही पावती दिली आहे. या परिसरातील विकासासाठी शासनाने मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्या कामावर विश्वास ठेवला. पक्षाचे सर्व नेते पाठिशी उभे आहेत. त्यामुळे हा विजय दृष्टिपथास आला.
– आ. बाळासाहेब सानप (शहराध्यक्ष, भाजप)

भाजपकडून अनिष्ट प्रथांचा पायंडा

निवडणुकीत जय-पराजय होत असतो. परंतु या पोटनिवडणुकीत भाजपने सत्तेचा वापर, पैशांची उधळण आणि दहशत याचा वापर केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मतदानासाठी बाहेर पडू शकला नाही. पुढील निवडणुकीत ही परंपरा कायम राहिल्यास नाशिकची सुरक्षितता धोक्यात येईल.
– अजय बोरस्ते
(महानगरप्रमुख, शिवसेना)