‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या अंतिम टप्प्यात नाशिकची निवड होण्यासाठी प्रशासनाने खासगी संस्थेच्या मदतीने तयार केलेला प्रस्तावावर बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फैसला होणार आहे. जुन्या नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आधी सिंहस्थामुळे वॉर्डातील विकासकामांना निधी मिळाला नसल्याची अस्वस्थता असल्याने या योजनेमुळे पडणारा नवीन बोजा शिरावर घ्यायचा की नाही, याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवक संभ्रमात आहेत. प्रशासनाने जय्यत तयारी केली असली तरी प्रस्तावाचे भवितव्य सभेतील निर्णयावर राहणार आहे.
मागील काही महिन्यांपासून शहरात ‘स्मार्ट सिटी’चा जागर सुरू आहे. केंद्राच्या निकषानुसार योजनेत नाशिककरांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. त्याकरिता कार्यशाळांचा धडाका लागला. अलीकडेच झालेल्या कार्यशाळेत जुन्या नाशिकसह पंचवटीतील गोदाकाठचा भाग, मखमलाबाद भागाचा कसा विकास होऊ शकतो, याचे ‘स्वप्नरंजन’ करण्यात आले. जुन्या नाशिकच्या गल्ल्यांमधील बाजारपेठेत खरेदीचा आनंद, जुन्या नगरपालिका इमारतीत होणाऱ्या संग्रहालयात नाशिकच्या वैभवाचे प्रदर्शन, वाघाडी नाल्यालगतच्या पदपथावर भटकंती आदींचा पालिका प्रशासनाने क्रिसिल संस्थेच्या माध्यमातून तयार केलेल्या प्रस्तावात अंतर्भाव केला. स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम फेरीसाठी महापालिकेकडून ३ डिसेंबपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर होणे आवश्यक आहे. त्याचे सादरीकरण महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, यांसह लोकप्रतिनिधीसमोरही करण्यात आले. सर्वसाधारण सभेत प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत स्पष्टपणे कोणी बोलत नसले तरी अनेक नगरसेवकांनी या योजनेची धास्ती घेतली आहे.
एखाद्या शहराला स्मार्ट करण्यासाठी जे जे काही हवे, त्या सर्व बाबींचा प्रस्तावात समावेश आहे. त्यात जुन्या नाशिकमध्ये पदपथ, गोदावरी नदीकाठच्या दोन्ही बाजूंना सायकल मार्ग, त्यास जोडणारे इतर रस्ते, गोदाकाठ परिसरात पर्यटन व विरंगुळा केंद्र, अरुंद गल्ल्यांमध्ये बाजारास उत्तेजन, दगडी पेव्हर ब्लॉकने परिपूर्ण महत्त्वपूर्ण रस्ते, मंदिरे व ऐतिहासिक वास्तुंसमोर ‘हेरिटेज वॉक’, खासगी विकास कामांमार्फत काझीगढीचा विकास आदी कामांचा समावेश आहे. मखमलाबाद, तपोवन, हनुमानवाडी या परिसराचा हरित क्षेत्रअंतर्गत विकास करण्याचे नियोजन आहे. आनंदवल्ली बंधारा ते रामवाडी पुलापर्यंत ‘शॉपिंग मॉल्स’ उभे करण्याचे प्रयोजन आहे. पूररेषेतील बांधकामांना अभय मिळण्याची आशा वर्तविण्यात आली. संपूर्ण जुन्या नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पालिका आयुक्तांनी आधीच स्पष्ट केले आहे.
‘स्मार्ट नाशिक’साठीचा भलामोठा खर्च हा नगरसेवकांच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा आहे. मागील दोन ते तीन वर्षांत निधीअभावी अनेकांच्या प्रभागात फारशी विकासकामे झाली नाहीत. सिंहस्थामुळे सर्व निधी तिकडे वळविला गेल्याचे कारण पुढे केले गेले.
सिंहस्थाची कामे संपुष्टात आल्यामुळे किमान प्रभागात विकासकामे होतील, या आशेवर नव्या योजनेमुळे पाणी फेरले जाते की काय, अशी काहींना साशंकता आहे. या कालावधीत पालिकेने सर्वेक्षणाद्वारे शहरवासीय करवाढीला तयार असल्याचे जे निष्कर्ष काढले, ते हास्यास्पद असल्याचे काहींना वाटते. प्रशासनाने १४ ते १५ पानांचा प्रस्ताव सदस्यांकडे दिला आहे. त्याचा अभ्यास करून वस्तुस्थिती लक्षात घेतली जाईल. आर्थिकदृष्टय़ा त्याचा भार सहन करता येईल काय यादृष्टीने विचार केला जाईल, असे सदस्यांनी सांगितले. एकंदर या प्रस्तावाबद्दलची मतमतांतरे सभागृहात पाहावयास मिळतील.