वसूबारसनिमित्त गाय-वासरूचे पूजन

तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास बुधवारी गाय-वासरू पूजन अर्थात वसूबारसने उत्साहात सुरुवात झाली. आकर्षक रोषणाई, पणत्यांची आरास, आकाश कंदील यांच्या लखलखाटाने शहर प्रकाशमय झाले आहे. या निमित्ताने बाजारपेठेत अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. केरसुणी, पणत्या व फूल विक्रेत्यांचे साम्राज्य असून सर्वच बाजारपेठा गजबजल्या आहेत.

यंदा प्रकाशाचा हा उत्सव सहा दिवस रंगणार आहे. गत काही वर्षांत एकाच दिवशी दोन सण येत असल्याने या उत्सवाचे दिवस कमी-अधिक होत असत, परंतु यंदा दीपोत्सवाचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठांची अवस्था अद्याप ‘जैसे थे’ आहे. लक्ष्मीपूजन व भाऊबीजसाठी अजून तीन ते चार दिवस अवधी असताना बाजारपेठांमधील खरेदीचा माहोल कायम आहे. वसूबारसनंतर लक्ष्मीपूजन व भाऊबीजच्या स्वागतासाठी व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे. खतावण्या, चोपडय़ा यांना व्यापारी लक्ष्मी म्हणून पूजत असल्याने लक्ष्मीपूजनाचे महत्त्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण. तर घराघरांमध्ये केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पुजले जाते. केरसुणी, पणत्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली. खरेदीसाठी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त चांगला मानला जात असल्याने सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, वाहन दुकानांमध्ये नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे.

दरम्यान, फटाक्यांमुळे ध्वनी व हवेतील प्रदूषणाबाबत कितीही ओरड होत असली तरी खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. गंगापूर रस्त्यावरील डोंगरी मैदानावर नाशिक जिल्हा फटाका असोसिएशनच्या स्टॉलवर फटाके खरेदीसाठी गर्दी होत आहे. फ्लॉवरपॉट, भूईचक्र, रॉकेट, लेस अशा पारंपरिक प्रकारांसोबत आवाज न करणाऱ्या फटाक्यांच्या खरेदीकडेही अनेकांचा कल आहे. त्यात सिग्नल लाइट, कलर फ्लॅश, माइन ऑफ क्रॅकर्स, व्हीसल व्हीज, ट्रिपल फन, एके ४७, ब्रेक डान्स, पिकॉक डान्स, ओह ला लाल आदी फॅन्सी प्रकारांचा समावेश आहे. आवाजाच्या फटाक्यांपेक्षा फॅन्सी प्रकारच्या फटाक्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. व्यापारी वर्गाचा कल माळा खरेदीकडे राहिल्याने एक हजारापासून ते १० हजारांपर्यंतच्या माळांची मोठय़ा प्रमाणात विक्री सुरू झाली आहे. महागाईची काहीशी ओरड असली तरी खरेदीवर परिणाम झाला नाही. यंदा पर्जन्यमान चांगले राहिले. त्यामुळे ग्रामीण भागात खरेदीत उत्साह आहे.

धनत्रयोदशीची तयारी

शुक्रवारी धनत्रयोदशीनिमित्त धन-धान्याची पूजा केली जाते. मात्र वैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाल्याने वैद्य मंडळी धन्वंतरीचे पूजन करतात. आरोग्यरूपी धन सर्वाना प्राप्त व्हावे याही उद्देशाने धनत्रयोदशीला धन्वंतरीचे पूजन केले जाते. धन्वंतरीचे विचार ज्या माध्यमातून सर्वासमोर आले त्या चरक संहितेत वैद्यकीय क्षेत्रासाठी एक प्रतिज्ञा दिली आहे. चरकाचार्यानी आरोग्य व व्याधी याबाबत ऋतुचर्या व दिनचर्येच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. चिकित्सेपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांना आज महत्त्व आले आहे. त्याचे जनक चरकच आहेत. वैद्याने व्यवसायाची सुरुवात करण्याअगोदर एक आगळीवेगळी शपथ सांगितली आहे. त्यात डॉक्टर, वैद्याची कामे स्पष्ट केली आहेत. मनुष्याच्या आरोग्याचे सर्वतोपरी संरक्षण, विविध व्याधी, विकृती लक्षणे निर्माण करणाऱ्या घटकापासून सर्व आयुधे, ज्ञानाचा, चिकित्सा पद्धतीचा वापर कोणत्याही शास्त्राच्या व्यक्तीने करणे गरजेचे आहे. या दिवशी घेतली जाणारी चरकाचार्याची शपथ आधुनिक युगातही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या शपथमध्ये रुग्णाची अहोरात्र सेवा, व्यवसायाशी प्रामाणिकता, नीतीमूल्यांचे पालन, नम्रता, व्यसनांपासून दूर या सर्व गोष्टींना महत्त्व देण्यात आले आहे. चरकाचार्याची शपथ चिकित्सक व रुग्ण यातील नाते जपण्यासाठी कोणत्या मुद्दय़ांचा विचार करावा हे स्पष्ट करणारी आहे.