सार्वजनिक गणेशोत्सवात घरगुती दरापेक्षा कमी म्हणजे तीन रुपये ७१ पैसे प्रति युनिट दराने वीज दिली जाणार असून गणेश मंडळांनी अधिकृत तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. पावसाळी दिवस असल्याने मंडळांनी वीज सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळ आकर्षक विद्युत रोषणाईवर भर देतात. त्यासाठी घरगुती अथवा वाणिज्यिक वीजजोडणीतून अनधिकृत पुरवठा घेतला जातो. हे प्रकार रोखण्यासाठी महावितरणने गणेशोत्सवासाठी अतिशय कमी दरात वीज देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबतची माहिती नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रति युनिट तीन रुपये ७१ पैसे अधिक इंधन अधिभार असा वीजदर आहे. मंडळांनी घरगुती किंवा वाणिज्यिक वीजजोडणीतून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास आर्थिकदृष्टय़ा तो महाग राहणार आहे. सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व देऊन धार्मिक उत्सवांसाठी अधिकृत वीजजोडणी घेणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडून करणे आवश्यक आहे. या कामात वापरण्यात येणाऱ्या वायर वीजभारासाठी सक्षम नसल्यास ‘शॉर्ट सर्किट’चा धोका निर्माण होतो. पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी पत्र्यांचा वापर होत असल्याने वायर मोकळी किंवा अनेक ठिकाणी तुटलेले, पण टेपने जोडलेली असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची दाट शक्यता असते. या स्थितीत तातडीच्या मदतीची गरज मंडळांना लागू शकते. यामुळे मंडळाच्या संबंधित क्षेत्रातील अभियंत्यांचे भ्रमणध्वनी नोंदवून ठेवावे, अन्यथा २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२००-३४३५ / १८००-२३३-३४३५ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुमठेकर यांनी केले. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या व रोहित्रांचा गणेशोत्सवातील तसेच मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच ‘न्यूट्रल’मुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

खबरदारीच्या सूचना

*  तुटलेल्या वा मोकळ्या होऊ शकणाऱ्या वायरचा वापर टाळा

* मंडप वा देखावे वीजवाहिन्यांना स्पर्श करणार नाही याची दक्षता घ्या

*  वीजपुरवठा आणि जनरेटर वापरताना स्वतंत्र ‘न्यूट्रल’ घ्या

*  रोषणाईचे काम अधिकृत वीज कंत्राटदाराकडूनच करा