• स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर
  • भाजपचे नऊ तर विरोधकांचे आठ सदस्य

गट नोंदणीच्या फेटाळलेल्या मुद्दय़ावरून शिवसेनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असताना गुरुवारी आधी निश्चित झाल्यानुसार सत्ताधारी भाजपने विशेष सर्वसाधारण सभा घेऊन स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केली. या वेळी सदस्यांची नावे सादर करणे आणि नंतर रिपाइंचा गटनेता नियुक्ती यावरून विरोधकांनी घोषणाबाजी करत कालहरण करण्याचा प्रयत्न केला. तथापि, महापौरांनी पक्षनिहाय तौलानिक बळानुसार भाजपचे नऊ, शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे आघाडीचे प्रत्येकी एक अशा १६ सदस्यांची स्थायी समितीपदी नावे जाहीर करत सभेचे कामकाज संपुष्टात आणले.

पालिकेतील सत्ताधारी भाजपला स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी केलेली व्यूहरचना सेना व रिपाइं गट नोंदणीचा प्रस्ताव फेटाळला गेल्यामुळे निष्प्रभ ठरल्यावर शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रिया आणि सर्वसाधारण सभेचे कामकाज एकाच वेळी होणार असल्याने सत्ताधारी भाजपने काही निर्णय येण्याआधी ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याकडे लक्ष दिले. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी प्रथम गट नेत्यांची बैठक पार पडली. या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादीने आपल्या सदस्यांचे नाव पत्राद्वारे सादर केले नाही. साडेअकरा वाजता सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाले. सुरुवातीला महापौरांनी गटनेत्यांची नावे जाहीर केली. त्यानुसार भाजपचे संभाजी मोरुस्कर, शिवसेनेचे विलास शिंदे, काँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, मनसेचे सलीम शेख यांची नावे जाहीर करण्यात आली. गटनेत्यांची निवड झाल्यानंतर खैरे यांनी सदस्याचे नावे देण्यासाठी एक तासाचा अवधी देण्याची मागणी केली, परंतु ही मागणी फेटाळून लावत महापौरांनी दहा मिनिटांचा अवधी देऊन सभा तात्पुरती तहकूब केली. यानंतर जेव्हा कामकाज सुरू झाले, तेव्हा शेलार यांनी पुन्हा तीच मागणी करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर पुन्हा दहा मिनिटांचा अवधी देण्यात आला.

दोन वेळा तहकूब झालेल्या सभेचे कामकाज संबंधित गटनेत्यांकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर सुरू झाले. या पत्राच्या आधारे महापौरांनी तौलानिक बळानुसार भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे आघाडीच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर केली. नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन व सत्कार होत असताना तसेच राष्ट्रवादीने सर्व पक्षीयांच्या गटनेत्यांची निवड झाली असताना, रिपाइंला का वगळण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला. त्या पक्षाच्या गटनेते पदाची निवड होणे गरजेचे असल्याचे शेलार यांनी सांगितले. सभागृहात घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर महापौरांनी सभेचे कामकाज संपुष्टात येत असल्याचे जाहीर केले. पत्रकारांशी संवाद साधताना भानसी यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना तौलानिक बळानुसार कोणाचे किती सदस्य निवडले जाणार याची कल्पना असल्याचे स्पष्ट केले.

त्यानुसार संबंधितांनी पत्राद्वारे आपणास सदस्यांची नावे दिली. न्यायालयीन निकाल काय लागणार याची कल्पना नसली तरी स्थायी सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सभापतिपदासाठी नव्या-जुन्यांचा संघर्ष कायम

विरोधकांची व्यूहरचना अखेरच्या टप्प्यात निष्प्रभ ठरल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. या निवडीवरून निष्ठावान आणि आयाराम असा पुन्हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. स्थायी सभापती पदासाठी नव्या-जुन्यांसह सर्वानी कंबर कसली आहे. सभापतीपदासाठी नाव निवडताना पक्ष नेत्यांना सर्वाना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. पालिकेच्या कामकाजाचा अनुभव असणाऱ्यांमध्ये मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले शशिकांत जाधव आणि काँग्रेसमधून आलेले शिवाजी गांगुर्डे यांच्या नावाचा समावेश आहे. मध्यंतरी या पदावर महिलेला स्थान देण्याची चर्चा सुरू होती. यामुळे अलका अहिरे व सीमा ताजणे यांच्या नावांची भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे, परंतु पुरुषाला या पदावर संधी दिली जाईल, असे संकेत वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले.

स्थायी समिती सदस्य

  • भाजप – जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, अ‍ॅड. शाम बडोदे.
  • शिवसेना – सूर्यकांत लवटे, दत्तात्रय सूर्यवंशी, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे
  • राष्ट्रवादी – राजेंद्र महाले, काँग्रेसच्या वत्सला खैरे आणि मनसे आघाडी मुशीर सय्यद