सात महिन्यांत केवळ ३०.३३ टक्के गुन्हे उघडकीस; मुख्यमंत्र्यांचीच माहिती

शहरातील वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत असतानाही गुन्हे घडतच असल्याने नाशिककर वैतागले आहेत. याचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले आणि नाशिकच्या गुन्हेगारीचा विषय चांगलाच गाजला. विधान परिषदेत यासंदर्भात गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ जानेवारी ते ३१ जुलै २०१६ या सात महिन्यांच्या कालावधीत शहरात विविध प्रकारचे १५८० गुन्हे घडले असून त्यापैकी केवळ ४८१ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती लेखी उत्तरात दिली.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीस आळा घाळण्यासंदर्भात काय प्रयत्न केले जात आहेत, याविषयी तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जुलैपर्यंतच्या सात महिन्यांत किती गुन्हे घडले, त्यापैकी किती गुन्ह्य़ांचा तपास लागला याची जंत्रीच सादर केली. त्यांच्या म्हणण्यानुसार जुलैपर्यंतच्या सात महिन्यांत खुनाच्या एकूण

२६ गुन्ह्य़ांपैकी २५ उघड झाले. आठ दरोडय़ांपैकी सात, ४७ जबरी चोऱ्यांपैकी १६, ६३ साखळीचोरीपैकी २२, २८ दिवसा घरफोडींपैकी सात, ११३ रात्र घरफोडींपैकी २८, २६७ इतर चोऱ्यांपैकी ७७, अवैधरीत्या शस्त्र बाळगण्याच्या ३० गुन्ह्य़ांपैकी २७, दुचाकी चोरीच्या २८९ पैकी ५६, वाहन जाळपोळीच्या १४ पैकी नऊ, सर्व चोरींच्या ५८८ पैकी १३८, १०७ अपहरणांपैकी ६९ गुन्हे उघड झाले आहेत. गुन्हे उघड होण्याचे एकूण प्रमाण ३०.४४ टक्के असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. स्थानिक पोलीस यंत्रणेकडून गुन्हे रोखण्यासाठी संबंधित आरोपींवर एमपीडीए, मोक्का, एमपीआयडी, तडीपार या कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे.  नागरिकांमध्येही प्रबोधन होण्यासाठी जास्तीत जास्त बैठका, प्रतिसाद अ‍ॅप व पोलीसमित्राची मदत तसेच खबऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.  याशिवाय बीट मार्शल, चौकी अमलदार, गस्ती पथक यांना प्रभावी गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांवर नजर ठेवून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले आहे.

दररोज लुटमार, सोनसाखळी चोरींचे प्रकार

जुलैनंतरच्या पाच महिन्यांतही शहरातील गुन्हेगारी कमी झालेली नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर एकटे गाठून लूट करणे आणि दुचाकीवरून भरधाव येत सोनसाखळी खेचून पलायन करण्याचे प्रकार दररोज शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात घडत आहेत. सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. शहरातील काही कुख्यात मंडळी सत्ताधाऱ्यांशी जवळीक ठेवून असल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होत नाही की काय, असा संशयही नाशिककरांमध्ये उपस्थित होत आहे. पोलिसांना मारहाणप्रकरणी कारवाई करण्यात आलेला नगरसेवक पवन पवारविरुद्ध नाशिककरांनी ओरड केल्यानंतरही अद्याप त्याच्याविरुद्ध पक्षातर्फेही कारवाई करण्यात आली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.