प्रतिसादाअभावी १९६ गाळे शिल्लक

दीपावलीनिमित्त शहरातील वेगवेगळ्या भागात फटाका गाळ्यांसाठी महापालिकेने उपलब्ध केलेल्या मोकळ्या जागेच्या भाडय़ापोटी ३५ लाख ७९ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात सहा लाख ४३ हजार ८६२ रुपयांनी वाढ झाली आहे. लिलावाद्वारे पार पडलेल्या या प्रक्रियेत जागा भाडे, केंद्र शासनाचा सेवा कर, अग्निशमन दाखला, पर्यावरण शुल्क व तत्सम बाबींतून एकूण ५४ लाख ७७ हजार रुपये जमा झाले आहेत. तथापि १९६ जागांना फटाके विक्रेत्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, त्या जागेवरील लिलाव स्थगित ठेवणे भाग पडल्याचे पालिकेने म्हटले आहे.

फटाके विक्रीसाठी जागा उपलब्ध करताना पोलिसांनी काही निकष घालून दिले होते. प्रत्येक गाळ्यात तीन मीटरचे अंतर, कोणत्याही सुरक्षित जाहीर केलेल्या सीमेपासून ५० मीटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉलची जागा नसावी, एकापेक्षा अधिक गाळे असल्यास त्यांचे प्रवेशद्वार समोरासमोर नसावे, फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा, अपघातास तोंड देण्यासाठी सुरक्षाव्यवस्था, रस्त्यालगत गाळे राहणार नाही याची खबरदारी अशी नियमावली बंधनकारक केली होती. या नियमावलीच्या आधारे पोलिसांची परवानगी घेऊन महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागात मोकळ्या जागांची निवड केली. त्या ठिकाणी प्रत्येकी दहा बाय दहा फुटाची खुली जागा फटाका विक्री गाळ्यासाठी पालिकेने उपलब्ध केली होती. लिलाव पद्धतीने विक्रेत्यांना हे गाळे देण्यात आले. त्यात १९३ जागांवरील गाळ्यांचे लिलाव झाले.

१९६ ठिकाणच्या गाळ्यांना विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. जाहीर लिलावातून बोलीद्वारे जागा शुल्कापोटी ३५ लाख ७९ हजार, केंद्र शासनाचा सेवा कर पाच लाख ३६ हजार, अग्निशमन दाखला शुल्क सात लाख ७२ हजार, स्वच्छ पर्यावरण शुल्क पाच लाख ७९ हजार, फटाका विक्री परवाना शुल्क नऊ हजार ६५० असे एकूण ५४ लाख ७७ हजार रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले.

मागील वर्षीचा विचार करता ही रक्कम २१ लाख ६९ हजार ८६२ ने अधिक आहे. गतवर्षी १७२ गाळ्यांचे लिलाव झाले होते. त्यावेळी एकूण ३३ लाख सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यात जागा शुल्कापोटीची रक्कम २९ लाख ३६ हजार रुपये होती. या उत्पन्नात यावेळी सहा लाख ६३ हजार रुपयांनी वाढ झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.