महापालिकेची आता मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम

उच्चभ्रूंची कॉलनी असो की, झोपडपट्टी परिसर असो. कुठेही डुकरांचा कळप मुक्तपणे भ्रमंती करताना दृष्टिपथास पडतो. नाशिक शहराची प्रतिमा डागाळणाऱ्या या प्राण्यालाच ‘स्मार्ट सिटी’साठी हद्दपार होण्याची वेळ आली आहे. महापालिकेने तशी तयारी सुरू  केली असून महिनाभरात शक्य तितके डुक्कर पकडून त्यांना शहराबाहेर नेण्याची जय्यत तयारी प्रशासनाने चालविली आहे.

Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

महापालिका क्षेत्रातील मोकाट डुकरे पकडणे व लिलाव पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या आरोग्य (पशुवैद्यकीय) विभागाने निविदा मागविली आहे. मोकाट व उपद्रवी कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेचे खास पथक अस्तित्वात आहे, तशी व्यवस्था मोकाट डुक्कर पकडण्यासाठी नाही. त्यातही मोकाट म्हटली जाणारी बहुतांश डुकरे कोणाच्या ना कोणाच्या मालकीची असतात. वराहपालन करणारे घटक त्यावर उदरनिर्वाह करतात. संबंधितांमार्फत एखाद्या विशिष्ट जागेत सांभाळ करण्याऐवजी ती वेगवेगळ्या भागांत सोडून दिली जात असल्याचा पालिकेचा आक्षेप आहे. त्यामुळे झोपटपट्टी ते कॉलनी वा बाजारपेठ परिसरातही डुकरांचे कळप भटकताना दिसतात.

डुक्कर खरे तर स्वच्छता राखणारा प्राणी. कचराकुंडी वा तत्सम घाण खाऊन तो स्वच्छता राखण्याचे काम करतो, मात्र घंटागाडी योजनेमुळे कॉलनी व वस्त्यांमधून कचराकुंडी कधीच लुप्त झाली. घराघरांतील कचरा थेट घंटागाडीत जात असल्याने डुकरांना खाद्य मिळणेही अवघड झाले.

या स्थितीत त्यांच्यामार्फत स्वच्छता कमी अन् उपद्रव अधिक झाल्याचा अनुमान नागरिकांच्या तक्रारींवरून काढला गेला आहे. या पाश्र्वभूमीवर, शहरात पहिल्यांदा मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईमागे स्मार्ट सिटी योजनेचाही प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे संदर्भ आहे.

शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनोखे प्रकल्प साकारताना डुकरांचे अस्तित्व चांगले दिसणारे नाही. हे गृहीत धरून डुकरांना हद्दपार करण्याचे नियोजन होत असल्याची वदंता आहे. प्रारंभी, प्रायोगिक तत्त्वावर महिनाभर डुक्कर पकडण्याची मोहीम राबविली जाईल. त्यातील त्रुटी व अन्य बाबींचा विचार करून पुढील काळात डुकरे पकडण्यासाठी कायमस्वरूपी काय करता येईल, याचे नियोजन केले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

महिनाभरात पकडलेल्या डुकरांची हे काम स्वीकारणाऱ्याने लिलाव पद्धतीने विल्हेवाट लावायची आहे. एक तर डुकराची मांस विक्री करणे अन्यथा त्यांना शहराबाहेर नेणे, असे दोन पर्याय संबंधिताना दिले गेले आहेत. तथापि, या कारवाईला बाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने विरोध केला आहे.

मालकांना नोटीस बजावून उपयोग नाही

डुकरांचा उपद्रव काही नवीन नाही. डुक्कर पालनास शहरात बंदी आहे. तरीदेखील काही व्यक्ती हा व्यवसाय करतात. त्यांच्यामार्फत डुकरे मोकाट सोडून दिली जातात. स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. डुक्कर घाणीत व कचराकुंडीवर भ्रमंती करणारा प्राणी असल्याने सर्वाना तो नकोसा वाटतो. मोकाट फिरणाऱ्या डुकरांबाबत नागरिक वारंवार तक्रारी करतात. महापालिका डुकरांच्या मालकाला नोटीस बजावते. या कारवाईनंतर काही काळ त्या भागातून डुकरे गायब होतात. पण कालांतराने पुन्हा दाखल होतात, असा अनुभव आहे. नोटीस बजावूनही फारसा उपयोग होत नसल्याने आता डुकरे पकडून त्यांची शहराबाहेर विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आले. या प्रकारची कारवाई शहरात प्रथमच होणार आहे.

-पशुवैद्यकीय विभाग, महापालिका

डुक्कर पकडण्यास विरोध

मोकाट डुक्कर पकडण्याची कारवाई झाल्यास त्यास कडाडून विरोध केला जाईल. सुमारे १०० कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. वर्षांनुवर्षांपासून डुक्कर पालनाचा व्यवसाय केला जात आहे. पालिका हद्दीत या व्यवसायास बंदी नाही. आमच्या वस्तीत त्यांचे पालन केले जाते. त्यांचा कोणताही उपद्रव नाही. महापालिकेने डुक्कर पालनासाठी रीतसर परवाना द्यावा आणि जागादेखील उपलब्ध करणे गरजेचे आहे.

– सुरेश मारू (कार्याध्यक्ष, बाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समिती)