नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सदस्य निवडप्रक्रिया आज (गुरूवार) पार पडली. स्थायी समितीवर भाजपचे ९, शिवसेनेचे ४, राष्ट्रवादीचे १, काँग्रेस १, मनसेचे १ याप्रमाणे सदस्यांची नियुक्तीची घोषणा विशेष महासभेत महापौरांनी केली.

भाजपकडून जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, श्याम बडोदे या ९ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे सुर्यकांत लवटे, दत्तात्रय सूर्यवंशी, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, या ४ तर मनसे आघाडीकडून मुशीर सय्यद, राष्ट्रवादी कडून राजेंद्र महाले, काँग्रेसकडून वत्सला खैरे यांच्या नियुक्तीची घोषणा महापौरांनी केली.
तसेच विविध पक्षीय गटनेत्यांची नावांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. भाजपचे संभाजी मोरुस्कर, काँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, शिवसेनेचे विलास शिंदे, मनसेचे सलीम शेख यांचा यामध्ये समावेश होता. महापौरांच्या हस्ते स्थायी सदस्य व गटनेत्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपमहापौर प्रथमेश गीते व महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा हे देखील यावेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती विविध पक्षांनी महापौरांना दिलेल्या पत्रातील नावांच्या याद्याप्रमाणे करण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या स्थायी समितीसाठी सदस्यांच्या नावांचे पत्र महापौरांना न मिळाल्याने दोन्ही पक्षांना महापौरांनी १० मिनिटांचा अवधी दिला. महापौरांना दोन्ही पक्षांकडून पत्र मिळाल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पक्षीय स्थायी सदस्यांची नावे घोषित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. सभा १० मिनिटांसाठी दोन वेळा तहकूब केल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते यांनी महासभेत गोंधळ घातला. सर्व पक्षांचे गटनेते नियुक्त झाले पण रिपाइं पक्षाचा का नाही असा प्रश्न त्यांनी महापौरांना विचारत गोंधळ घातला. पक्षांनी दिलेल्या नावाप्रमाणेच ही नियुक्तीची घोषणा केल्याचे महापौरांनी सांगितले. स्थायी सदस्यांच्या नावाची घोषणा महापौर करत असताना देखील शेलार यांनी महापौर यांना बोलताना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपच्या सदस्यांनी बाक वाजवून महापौर यांना समर्थन करत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. स्टेजवर स्थायी सदस्यांना सत्कारासाठी महापौरांनी आमंत्रण देताच शेलार यांनी आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत पुन्हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी या गोंधळाला शांत करण्यासाठी सदस्यांचा सत्कार होताच राष्ट्रगीत सुरु करत सभेचा समारोप केला.
विभागीय आयुक्तांची हरकत
तौलनिक संख्याबळानुसार सर्व पक्षीय स्थायी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ मार्च रोजी स्थायी समिती संबंधित झालेल्या बैठकीत शिवसेनेने रिपाइंच्या सदस्याला गटनोंदणीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी हरकत घेतली होती. विभागीय आयुक्तांच्या यानिर्णयावर शिवसेनेने कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी कोर्टाने आज संध्याकाळी निर्णय दिला तर आपला निर्णय काय असेल या प्रश्नावर त्यांनी, ही स्थायी समितीबाबत ही निवडप्रक्रिया आज पूर्ण झाली असून. कोर्टाच्या आदेश व नियमाप्रमाणे पुढील कृती केली जाईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले.